राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेला प्रारंभ
By Admin | Updated: July 6, 2014 23:36 IST2014-07-06T23:36:31+5:302014-07-06T23:36:31+5:30
राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. मात्र, पेरणीपूर्वीच या योजनेची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.

राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेला प्रारंभ
अमरावती : राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. मात्र, पेरणीपूर्वीच या योजनेची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये ६० ते ८० टक्के जोखीमस्तर आहे. पिकानुरूप दर हेक्टरी १३ हजार ते २ लाख ४२ हजार रूपयांपर्यंत विम्याचे संरक्षण कवच पिकांना लाभणार आहे. सोमवार ७ जुलै २०१४ पासून योजनेची सुरुवात होत आहे. यापूर्वीच्या योजनेत वंचित शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना पीक पेरणीपासून एक महिना किंवा ३१ जुलै यापैकी जी तारीख आधी असेल त्या तारखेपर्यंत बँकामध्ये विमा प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत.
राष्ट्रीय कृषी विमा योजना रबी १९९९-२००० हंगामापासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व भारतीय कृषी विमा कंपनीच्या सहकार्याने राज्यातील अधिसूचित मंडळातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, उडीद, मूग, तूर, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, सूर्यफुल, कापूस व कांदा या पिकांचा समावेश आहे. यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आणि बँकांनी या शेतकऱ्यांचे प्रस्ताव भारतीय कृषी विमा कंपनीकडे सादर करणे अनिवार्य आहे.
कंपनीला वित्तीय संस्थेमार्फत प्राप्त विमा प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून विहित मुदतीत शेतकऱ्यांनी विमा हप्ता जमा केल्यास त्यांना विमा संरक्षण देणे महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)