NASA will immediately provide forest fire alerts | ‘नासा’ तात्काळ देणार जंगलातील आगीचा अलर्ट

‘नासा’ तात्काळ देणार जंगलातील आगीचा अलर्ट

ठळक मुद्देवनकर्मचाऱ्यांची नोंदणी सुरूवनरक्षक ते मुख्य वनसंरक्षकांचे कार्यक्षेत्र उपग्रह प्रणालीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
गणेश वासनिक
अमरावती : जंगल अथवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्यास आता ही माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा क्षणात संबंधित वनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर देणार आहे. त्याअनुषंगाने नासाच्या संकेतस्थळावर अमरावती विभागात आतापर्यंत ७५ टक्के वनकर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) यांनी जानेवारीमध्ये विभागीय वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वनवणवा नियंत्रणाबाबत सूचना केल्या. या बैठकीत वनरक्षक ते मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यक्षेत्राची नोंदणी नासाच्या संकेतस्थळावर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. आता ही नोंदणी युद्धस्तरावर सुरू असून, वनवणवा नियंत्रणासाठी १५ फेब्रुवारी ते १५ जून २०२० या दरम्यान सजग राहण्याच्या सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या आहेत. जंगल किंवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्यास वनकर्मचाºयांना मोबाइलवर ‘रियल टाइम डेटा’ मिळेल.
वनवणवा नियंत्रणासाठी विभागीय, जिल्हा व तालुकास्तरावर आग प्रतिबंधक स्वतंत्र चमू तैनात आहे. आतापर्यंत जंगलातील आगीची माहिती डेहराडून येथील भारतीय वन सर्वेक्षण संस्था देत होती; पण ती आग लागल्यानंतर दोन ते अडीच तासांनी मिळायची. नासाकडून मात्र उपग्रहाद्वारे आगीची माहिती क्षणात मिळणार आहे.

‘फायर मॅनेजमेंट मॅप’ तयार
राज्याच्या वनविभागाने गत तीन वर्षांत जंगल, राखीव वनक्षेत्रातील आगींची दखल घेत ‘फायर मॅनेजमेंट मॅप’ तयार केला आहे. यात आगीची कारणे, नुकसानाची आकडेवारी, उपाययोजना, आगीनंतर दाखल गुन्हे, रस्ते, रोपवन, संशोधन प्लॉट, लाकूड डेपो, कूपवर्किंग, निरीक्षण कुटी आदी महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे.

जंगलातील आगीची माहिती तत्क्षण मिळेल, अशी सुविधा नासाने उपग्रहाद्वारे मोबाइलवर उपलब्ध केली आहे. आगीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल.
- प्रवीण चव्हाण, मुख्य वनसंरक्षक, अमरावती.

Web Title: NASA will immediately provide forest fire alerts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.