अमरावती, दि. 4 - अघोरी विद्येचा प्रयोग करून उपचार करण्याच्या नावावर एका आजारी महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील वरूडनजीकच्या झटामझिरी येथे घडली. महिलेचा आजार बरा न होता वाढतच गेल्याने ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी वरूड पोलिसांत तक्रार करण्यात आली असून आरोपी मांत्रिक प्रभू गणपत पाटील (रा.मोटागाव, झटामझिरी) हा पसार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, आदिवासीबहुल झटामझिरी येथील ६५ वर्षीय पीडिता मागील दोन वर्षांपासून विविध आजारांनी ग्रस्त आहे. आजारावर उपचार घेण्यासाठी १० महिन्यांपूर्वी ती गावातीलच मांत्रिक प्रभू पाटील यांच्याकडे गेली. मांत्रिक तिला घरी बोलावून पूजा, लिंबू, अंगारा व जादूटोणा करून काही तरी खाण्यास देत होता. यामुळे कधी तिचे दुखणे कमी, तर कधी वाढत होत होते. दरम्यान एप्र्रिल महिन्यात हजार रुपये व धान्य दिल्याचेही पीडितेने सांगितले. मे महिन्यात अमावस्येला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मांत्रिकाने पीडितेला नजीकच्या शेतात नेऊन अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. कपडे कशासाठी काढायचे असे विचारल्यावर, ‘तसा उपचार करता येणार नाही’ असे सांगितले. पीडितेला विवस्त्र करून तिच्या डोळ्यात व गुप्तांगात लिंबू पिळून तिचा विनयभंग केला. यानंतर ती महिला घरी परत आली. मात्र, या अघोरी प्रकारामुळे तिचा त्रास कमी न होता वाढत गेला. ती पुन्हा मांत्रिकाकडे गेल्यावर तो पसार झाल्याचे आढळून आले. ही घटना काही दिवसांपूर्वी तिने तिच्या समवयस्क महिलांना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिने घरातील सदस्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर या प्रकरणाची तक्रार वरूड पोलीस ठाण्यात शनिवारी देण्यात आली. यावरून ठाणेदार गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंगाडे, उपनिरीक्षक उमाळे, जमादार अंबादास पडघामोड पोकाँ रवींद्र धानोरकर, मांत्रिक प्रभू गणपत पाटील (रा.मोटागाव, झटामझिरी) याचेविरूद्ध भादंविचे कलम ३७६(१)चे सहकलम २(१),(ख), ३(२) महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून मांत्रिकाचा वरूड पोलीस शोध घेत आहेत.
अघोरी विद्येतून उपचाराच्या नावावर महिलेचा विनयभंग, डोळ्यांसह गुप्तांगात पिळले लिंबू, मांत्रिक फरार,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 20:37 IST