"माझी बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नाही", एम. एस. रेड्डी यांचे वनखात्याला चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 06:49 PM2021-03-28T18:49:17+5:302021-03-28T18:49:46+5:30

M. S. Reddy's challenge to the forest department : माझी कोणत्याही प्रकारे चौकशी न करता तडकाफडकी बदली करणे, हे नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार नाही. याबाबत पुनर्विचार करून बदली रद्द करावी, असे रेड्डी यांनी पत्रात म्हटले आहे.

“My replacement is not by natural justice”, M. S. Reddy's challenge to the forest department | "माझी बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नाही", एम. एस. रेड्डी यांचे वनखात्याला चॅलेंज

"माझी बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नाही", एम. एस. रेड्डी यांचे वनखात्याला चॅलेंज

Next

अमरावती : राज्य सेवेतील एका अतिरिक्त मुख्य सचिवांच्या जोरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह पश्चिम विदर्भातील अभयारण्य काबीज करणारे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांनी नागपूर येथे मुख्यालयात झालेली बदली रद्द करण्यासाठी राज्याच्या वनखात्याला पत्र लिहून चॅलेंज केले आहे. माझी कोणत्याही प्रकारे चौकशी न करता तडकाफडकी बदली करणे, हे नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार नाही. याबाबत पुनर्विचार करून बदली रद्द करावी, असे रेड्डी यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे बदलीला चॅलेंज करणारे रेड्डी हे आयएफएस लॉबीला जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (“My replacement is not by natural justice”, M. S. Reddy's challenge to the forest department)

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी सुसाईड नोटनुसार एम.एस. रेड्डी यांच्यावरही संशयाची सुई वळली आहे. परिणामी राज्याच्या वन मंत्रालयातील मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी २६ मार्च रोजी रेड्डी यांची अमरावती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावरून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेशित केले आहे. परंतु, रेड्डी यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून बदली नको आहे. मार्च एन्डला बदली कशी, याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे रेड्डी यांनी २७ मार्च रोजी पत्राद्धारे नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) पी. साईप्रसाद यांना बदलीसंदर्भात पुनर्विचार करावा, असे नमूद केले आहे.

गत पाच वर्षांपासून एम. एस. रेड्डी हे सन २००७ ते २००९ पर्यंत अकोट वन्यजीव विभागात उपवनसंरक्षक पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांची पेंच व्याघ्र प्रकल्पात बदली झाली. मुख्य वनसंरक्षकपदी बढती मिळाल्यानंतर सन २०१७ मध्ये रेड्डी हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकपदी रुजू झाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालकपद हे राज्यातील इतर पाच व्याघ्र प्रकल्पांप्रमाणे मुख्य वनसंरक्षक दर्जाचे आहे. गत पाच वर्षांत रेड्डी यांनी पश्चिम विदर्भातील अभयारण्य काबीज केले. आता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर बढती मिळाल्यानंतरही नागपूर, पुणे, मुंबई येथे न जाता राज्यातील अन्य आयएफएस लॉबीला चॅलेंज करून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकपद अमरावती येथे निर्माण करून घेतले. बढती झाल्यानंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मोह त्यांना दूर करू शकला नाही, हे स्पष्ट होते. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पद हे राज्यस्तरावरील आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाची परवानगी न घेता मंत्रालयातील अतिरिक्त मुख्य सचिवांच्या बळावर अमरावती विभाग स्तरावर हे पद निर्माण करण्याची किमया रेड्डी यांनी केली आहे.

बदलीला विरोध का?

गत पाच वर्षांपासून एम. एस. रेड्डी यांना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यातील खडान्‌खडा माहिती आहे. वनसंवर्धन अधिनियम १९८० च्या कायद्याचा रेड्डी भंग केला आहे. केंद्र व राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता जेसीबी व अन्य यंत्राच्या साह्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कारंजाचे सोहळ अभयारण्य, लोणार सरोवर, बुलडाणा येथील ज्ञानगंगा, यवतमाळचे टीपेश्वर, अकोला येथील पैनगंगा या अभयारण्यात वनसंवर्धनाचा फज्जा उडवीत पर्यटनाच्या नावाखाली संरक्षित क्षेत्रात जेसीबीने रस्ते, इमारती उभ्या केल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी होऊ नये, यासाठी रेड्डी हे बदलीला विरोध करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एम.एस. रेड्डी यांनी पाठविलेले पत्र अद्याप मला प्राप्त झालेले नाही. मात्र, रेड्डी यांचा कार्यभार अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शासनादेशाची कार्यवाही पूर्णत्वास आलेली आहे. रेड्डी पत्रात काय म्हटले, याबाबत शासनाला कळव.
- पी. साईप्रसाद,
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) नागपूर

Web Title: “My replacement is not by natural justice”, M. S. Reddy's challenge to the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.