पथ्रोट येथे वेटरचा खून

By प्रदीप भाकरे | Updated: January 3, 2024 20:22 IST2024-01-03T20:22:35+5:302024-01-03T20:22:53+5:30

दांडक्याने डोक्यावर वार करीत खून केल्याची कबुली अटक वेटरने पथ्रोट पोलिसांकडे दिली आहे.

Murder of a waiter at Patthroat | पथ्रोट येथे वेटरचा खून

पथ्रोट येथे वेटरचा खून

अमरावती : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथे महामार्गालगत हॉटेल अतिथी ढाबा अँड रेस्टॉरंटमध्ये वेटरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासादरम्यान हा खून असल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी ३ जानेवारी रोजी तेथीलच एका वेटर व कूकला ताब्यात घेण्यात आले. दांडक्याने डोक्यावर वार करीत खून केल्याची कबुली अटक वेटरने पथ्रोट पोलिसांकडे दिली आहे. संदीप ज्ञानेश्वर दामले (४०, रा. वाल्मिकपूर) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. तो याच ढाब्यावर रात्री वास्तव्यास राहत होता.
 
२ जानेवारी रोजी रात्री ढाबामालक मोहन पाटील हे प्रतिष्ठान बंद करून घरी गेले. ३ जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे ढाब्यावर आले असता, त्यांना संदीप दामले हा दृष्टीस पडला नाही. त्याची शोधाशोध केली असता, हॉटेलच्या मागच्या बाजूला रक्ताने माखलेला त्याचा मृतदेह आढळला. या घटनेची त्यांनी पोलिस ठाण्याला माहिती दिल्यावर ठाणेदार विनायक लंबे हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित वेटर अंकुश इंगळे व कूक गणेश सचान यांना त्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.

ढाब्यावर गणेश सचान (रा. अमरावती) हा कूक म्हणून कामाला होता. ज्ञानेश्वर दामले हा मागील एक महिन्यापासून, तर त्याच्या दोन दिवसांपूर्वी अंकुश इंगळे (रा. सामदा, ता. दर्यापूर) हे वेटर म्हणून कामाला लागले होते. रात्रीला जेवताना त्यांच्यात भांडण झाले. त्यावेळी दंडुक्याने डोक्यात वार करून त्याचा मृतदेह हॉटेलच्या मागच्या बाजूला नेऊन टाकल्याची  कबुली अंकुशने दिली आहे.

Web Title: Murder of a waiter at Patthroat