बांधकामाच्या वादातून दाम्पत्याची हत्या, तीन आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 21:20 IST2017-12-06T21:18:05+5:302017-12-06T21:20:28+5:30
परतवाडा (अमरावती) : घराच्या बांधकामस्थळी आणलेल्या ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून तिघांनी चुलत भाऊ व वहिनीची हत्या केली.

बांधकामाच्या वादातून दाम्पत्याची हत्या, तीन आरोपी अटकेत
परतवाडा (अमरावती) : घराच्या बांधकामस्थळी आणलेल्या ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून तिघांनी चुलत भाऊ व वहिनीची हत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चांदूर बाजार तालुक्यातील गोविंदपूर येथे घडली. या प्रकरणी शिरजगाव पोलिसांनी तिन्ही भावंडांना अटक केली आहे.
कैलास उत्तम लिल्हारे (४५) व गीता कैलास लिल्हारे (४०) अशी मृतांची नावे आहेत. जगन, मदन व रतन लिल्हारे अशी अटकेतील आरोपी भावंडांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, कैलास लिल्हारे यांचे त्यांच्या चुलत भावांशी जुना वाद आहे. कैलास हे घराचे काम करीत असल्याने बुधवारी त्यांनी मलबा भरण्यासाठी मातीचा ट्रॅक्टर बोलाविला होता. या ट्रॅक्टरचा धक्का आरोपी भावंडांच्या घराच्या बांबूला लागला. यामुळे तो खाली पडला. यातून वाद निर्माण झाला व तो विकोपाला गेला. दरम्यान आरोपींनी लोखंडी पाईपने कैलास व त्याची पत्नी गीता यांच्या डोक्यावर प्रहार केले. यात लिल्हारे दाम्पत्य गंभीर जखमी झाले.
यानंतर गावातील स्वप्नील सावरकर व गोलू फैजान व अंकुश रणगिरे यांनी जखमी दाम्पत्याला बेशुद्धावस्थेत अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माहिती मिळताच शिरजगाव कसबाचे ठाणेदार मुकुंद कवाडे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मारहाण व हत्येचा प्रयत्न करणा-या तीनही भावंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरू होती.
मुलगी झाली पोरकी
मृत दाम्पत्य कैलास व गीता यांना स्वाती नामक ११ वर्षांची एकच मुलगी आहे. ती इयत्ता पाचवीत शिकते. आई-वडिलांची हत्या झाल्याने तिच्यावर मोठा आघात झाला असून तिचे अश्रू अनावर झाले. आई-वडिलांचे छत्र हरपल्याने ती पोरकी झाली आहे.
पती-पत्नीच्या हत्येप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. डोक्यावर ज्या लोखंडी वस्तूने मारले ती जप्त करण्यात आली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
- मुकुंद कवाडे,
ठाणेदार, शिरजगाव कसबा