महापालिका रिकामी; अधिकारी गाव-मुक्कामी
By Admin | Updated: December 10, 2014 22:49 IST2014-12-10T22:49:51+5:302014-12-10T22:49:51+5:30
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई, नापिकी आदींबाबत उपाययोजना करण्याचा अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी राबविलेल्या ‘अधिकाऱ्यांचा गाव मुक्काम’ या सकारात्मक

महापालिका रिकामी; अधिकारी गाव-मुक्कामी
अमरावती : शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई, नापिकी आदींबाबत उपाययोजना करण्याचा अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी राबविलेल्या ‘अधिकाऱ्यांचा गाव मुक्काम’ या सकारात्मक उपक्रमाचे भरभरुन कौतुक करावे तेवढे कमी आहे. मात्र नऊ लाख लोकसंख्येच्या मूलभूत सोई सुविधांची जबाबदारी हाताळणाऱ्या महापालिकेतील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आल्यामुळे कोणाकडे कैफियत मांडावी, हा प्रश्न नगरसेवकांपुढे उपस्थित झाला होता, हे विशेष.
जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतींमध्ये मुक्काम करुन गावात निर्माण झालेल्या समस्यांवर आकलन करुन त्यावर उपाययोजना म्हणून हे अधिकारी गावात मुक्काम करणार आहेत. परंतु महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांची एकाच वेळी या कामी नियुक्ती करण्यामागील कारण काय? याबाबत चांगलीच चर्चा ऐकावयास मिळाली. प्रशासकीय कामांचे नियोजन करावयाचे झाल्यास वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी हे आवश्यक राहतात. मात्र महापालिकेत अतिमहत्त्वाच्या विभाग सेवेतील अधिकाऱ्यांचीदेखील गाव मुक्कामी नियुक्ती करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाच्या या कारभारावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. महानगरात आग, आरोग्य किंवा अतिक्रमणासारखी एखादी गंभीर समस्या उदभ्वल्यास ती हाताळण्यासाठी सक्षम यंत्रणा कशी उभी करावी, हा सवाल महापालिका आयुक्तांसमोर काही काळ निर्माण झाला होता. अखेर शेतकऱ्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यासाठी हा अभिनव उपक्रम असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने निवड करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना गाव मुक्कामी पाठविले. तर दुसरीकडे प्रमुख अधिकारीच दालनात नसल्याने समस्या, प्रश्न घेऊन महापालिकेत आलेल्या लोकप्रतिनिधींना आल्या पावली परतण्याचा प्रसंग ओढवला. महापालिकेत बुधवारी जवळपास महत्त्वाचे कक्ष हे अधिकाऱ्यांविनाच सुरु होते. प्रमुख अधिकारी नसल्याने कर्मचारीही कार्यालयात दांडी मारताना दिसून आले. (प्रतिनिधी)