पालिकेची ५० लाखांची इमारत बनली जुगाऱ्यांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 22:19 IST2018-02-23T22:19:29+5:302018-02-23T22:19:29+5:30
स्थानिक नगरपालिकेच्या मालकीची विशेष निधी अंतर्गत ५० खर्च करून बांधण्यात आलेली अग्निशमन विभागाची इमारत पाच वर्षांपासून बेवारस अवस्थेत पडली आहे.

पालिकेची ५० लाखांची इमारत बनली जुगाऱ्यांचा अड्डा
आॅनलाईन लोकमत
चांदूर बाजार : स्थानिक नगरपालिकेच्या मालकीची विशेष निधी अंतर्गत ५० खर्च करून बांधण्यात आलेली अग्निशमन विभागाची इमारत पाच वर्षांपासून बेवारस अवस्थेत पडली आहे. रात्री जुगार, अश्लील चाळे करणाऱ्यांचा हा अड्डा बनतो. या इमारतीच्या खिडक्यांचे काच फोडून अॅल्युमिनियम चौकटी लंपास करण्यात आल्या आहेत.
मोर्शी-चांदूर बाजार रोडवर अग्निशमन विभागाची इमारत नगरपालिकेने बांधून बेवारस अवस्थेत सोडून दिली आहे. या इमारतीवर ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. यामध्ये कर्मचारी निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, वीज आणि पाण्याची सुविधा नसल्यामुळे ही इमारत पांढरा हत्ती बनली आहे. ही इमारत बांधकाम झाल्यापासून पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने चोरट्यांनी खिडकीच्या काचा फोडून सर्व अॅल्युमिनियमच्या चौकटी चोरून नेल्या आहेत तसेच इमारतीच्या स्लॅबवरील २००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी मागील बाजूला टाकून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तर एक टाकी चोरण्याच्या प्रयत्नात इमारतीवरून खाली पडल्याने जागीच फुटली. ती टाकी इमारतीच्या मागील बाजूला चोरट्यांनी तशीच सोडून दिले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ५० लक्ष रुपये खर्च करून उभी केलेली ही इमारत चोरट्यांचा अड्डा बनली आहे.
इमारतीची दुरवस्था
इमारतीतील महागडी पाइप लाइन, खिडक्या, चोरट्याने लंपास केल्या असून, सर्वत्र काचांचा खच पडला आहे. इमारतीत दारूच्या बाटल्या, जुगाराचे साहित्यच नव्हे तर अश्लील साहित्यदेखील पडलेले आढळते.
वीज-पाणी सुविधा देणार
इमारतीच्या दुरवस्थेकडे पालिकेचे बांधकाम सभापती अतुल रघुवंशी यांचे लक्ष वेधताच, पालिकेच्या अभियंत्यासह अग्निशमन विभागाच्या या इमारतीला भेट देऊन तेथे वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी ठराव घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. .