महानगरपालिका ३० लाखांत खरेदी करणार दोन गॅस, एक विद्युत दाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST2021-04-24T05:00:00+5:302021-04-24T05:00:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोनाने मृत्युसंख्या वाढत असल्याने मृतदेहांचे अंत्यविधी करण्यासाठी नियोजन कोलमडले आहे. परिणामी महापालिका प्रशासनाने कोविड ...

महानगरपालिका ३० लाखांत खरेदी करणार दोन गॅस, एक विद्युत दाहिनी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाने मृत्युसंख्या वाढत असल्याने मृतदेहांचे अंत्यविधी करण्यासाठी नियोजन कोलमडले आहे. परिणामी महापालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधात्मक निधीतून दोन गॅस दाहिनी, तर एक विद्युत दाहिनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता जीईएम (जेम) पोर्टलवर आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूपश्चात मृतदेहावर येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यविधी केला जातो. कोविड, नॉन कोविड रुग्णांची मृत्युसंख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे हिंदू स्मशानभूमीत अंत्यविधीच्या वेळी प्रचंड ताण येत आहे. गॅस दाहिनीत एका कोरोना मृतदेहाकरिता दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे मृतदेहांकरिताही रांगा लागण्याची वेळ आली आहे. हा ताण कमी करण्यासाठी इतर स्मशानभूमींसाठी दोन गॅस दाहिनी, एक विद्युत दाहिनी खरेदीसाठी निविदा प्रक्रियेला मान्यता प्रदान करण्यात आली. एका प्रकल्पासाठी अंदाजे १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार ३० लाख रुपयांचा खर्च कोविड प्रतिबंधात्मक निधीतून केला जाणार आहे. जेम पोर्टलवर ही निविदा मागविली जाणार असून, सोमवारी ई-निविदा प्रारंभ होईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली. विलासनगर, शंकरनगर स्मशानभूमीत प्रत्येकी एक गॅस दाहिनी, तर विद्युत दाहिनी ही हिंदू स्मशानभूमीत कार्यान्वित होईल.
निविदा काढण्यास मान्यता प्रदान करण्यात आली. जेम पोर्टलवर लघुनिविदेने ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. गॅस दाहिनी, विद्युत दाहिनी कार्यान्वित करण्यासाठी स्थळ निश्चित केले जाणार आहे. दोन ते तीन स्मशानभूमी विचाराधीन आहेत.
- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका
कोरोना मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी पर्यायी व्यवस्थेची मागणी
हिंदू स्मशानभूमीत सकाळी ७ ते रात्री ११ दरम्यान कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी केला जाताे. गॅस दाहिनी आणि सरणावरील अंत्यसंस्कारामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात धुराचे कण वायूद्वारे येत असल्याच्या तक्रारी नुकत्याच करण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत राेडे यांनी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने दोन गॅस, एक विद्युत दाहिनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था तातडीने कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.