अतिक्रमणधारकांना महापालिकेची नोटीस
By Admin | Updated: August 28, 2014 23:29 IST2014-08-28T23:29:41+5:302014-08-28T23:29:41+5:30
नवसारीतील महापालिकेच्या भूखंड क्र. ३४ मधील अतिक्रमण सात दिवसांच्या आत काढण्याचे आदेश देणाऱ्या नोटिशी महापालिकेने बजावल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

अतिक्रमणधारकांना महापालिकेची नोटीस
अमरावती : नवसारीतील महापालिकेच्या भूखंड क्र. ३४ मधील अतिक्रमण सात दिवसांच्या आत काढण्याचे आदेश देणाऱ्या नोटिशी महापालिकेने बजावल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पर्यायी जागेची मागणी केली आहे.
स्थानिक नवसारी येथील भूखंड क्र. ३४ या जागेवर सुमारे २० वर्षांपासून २५ पेक्षा जास्त गरीब कुटुंब वास्तव्याला आहेत. त्यांनी या जागेवर राहण्यासाठी तात्पपरत्या झोपड्या उभारल्या आहेत. परंतु महापालिकेच्यावतीने त्यांना ११ आॅगस्ट रोजी नोटिीशी बजावण्यात आल्या असून सात दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्यासंदर्भात बजावण्यात आले आहे.
स्वत: अतिक्रमण न काढल्यास मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार महापालिका हे अतिक्रमण काढून त्याचा खर्च अतिक्रमण धारकांकडून वसूल करण्यात येईल, असे या नोटीशीत नमूद केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या नागरिकांनी नगरसेवक भूषण बनसोड यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. आहे त्याच ठिकाणी स्थायी स्वरुपात जागा मिळावी किंवा पर्यायी जागेची व्यवस्था करुन द्यावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये नगरसेवक भूषण बनसोड, विठ्ठल डाबेराव, मनोज करहार, कांता करहार, सुधीर गायकवाड, आशा परिहार, भागवतराव हरसुले, राजकुमार कोठार, वर्षा भैसार, बबन नंदेश्वर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)