मुंबई एक्स्प्रेस आता २४ डब्यांची
By Admin | Updated: September 28, 2015 00:20 IST2015-09-28T00:20:30+5:302015-09-28T00:20:30+5:30
पश्चिम विदर्भातील प्रवाशांच्या पसंतीला उतरलेली अमरावती-मुंबई एक्स्प्रेस आता १८ ऐवजी २४ डब्यांची होणार आहे.

मुंबई एक्स्प्रेस आता २४ डब्यांची
खासदारांचे प्रयत्न : आॅक्टोबरपासून अंमलबजावणीची शक्यता
अमरावती : पश्चिम विदर्भातील प्रवाशांच्या पसंतीला उतरलेली अमरावती-मुंबई एक्स्प्रेस आता १८ ऐवजी २४ डब्यांची होणार आहे. खासदार आनंदराव अडसूळ यांनी याबाबत रेल्वे मंत्र्याकडे पत्रव्यवहार सुरू केला असून १ आॅक्टोबरपासून अंमलबजावणी होण्याचे संकेत आहेत.
अमरावती- मुंबई एक्स्प्रेस ही १ जुलै २००७ पासून सुरू करण्यात आली असून तेव्हापासून ही गाडी ‘हाऊसफुल्ल’ धावत आहे. प्रारंभी १३ डब्यांची अमरावती- मुंबई एक्स्प्रेस कालातंराने १८ डब्याची करण्यात आली. मुंबईकडे ये- जा करण्यासाठी अतिशय सोयीची रेल्वे गाडी अमरावती- मुंबई ही प्रवाशांसाठी ठरली आहे. गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये आरक्षण मिळत नसल्याने वर्धा, पूलगाव, धामणगाव, चांदुर रेल्वे येथूनसुद्धा मुंबईसाठी अमरावती रेल्वे गाडीचे आरक्षण मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे वास्तव आहे.
सतत ‘हाऊसफुल्ल’ धावणाऱ्या अमरावती- मुंबई एक्सप्रेसमध्ये डब्यात वाढ करण्यात यावी, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यानुसार खा. आनंदराव अडसूळ यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र देवून या गाडीत सहा डब्यात वाढ करण्यात यावी, असे कळविले आहे. परंतु रेल्वे मंत्रालयाने सहा ऐवजी तीन डबे वाढविण्याचा निर्णय घेतला असून ही अंमलबजावणी येत्या १ आॅक्टोबरपासून केली जाईल, असे संकेत आहे. पश्चिम विदर्भातील प्रवाशांच्या पसंतीला उतरलेली अमरावती- मुंबई एक्स्प्रेसमध्ये मुंबईसाठी आरक्षण मिळत नसल्याची अनेकांची ओरड आहे. सतत ‘हाऊसफुल्ल’ धावणाऱ्या या गाडीला सर्वच प्रवासी पसंती देत असल्याने हल्ली ही गाडी विदर्भ एक्स्प्रेसला मागे टाकत असल्याचे दिसून येते.
एक वातानुकुलित तृतीयश्रेणी, द्वितीय श्रेणी तर तीन आरक्षणाचे स्लिपर कोच मंजूर करण्यात आले आहे. एक पेन्ट्रीकार व लगेज, अपंग व गार्डसाठी स्वतंत्र डबा राहणार आहे. पुष्कर एक्स्प्रेसचे डबे मुंबई एक्स्प्रेसला राहतील.
(प्रतिनिधी)
मुंबई तिकीट व्यवसायातून अडीच कोटी
अमरावती रेल्वे स्थानकावर मुंबईमार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची तिकीटविक्री ही दरमहा अडीच कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी सर्वाधिक व्यवसाय देत आहे. त्यानंतर विदर्भ एक्सप्रेस, कुर्ला एक्स्प्रेस, हावडा- मुंबई मेल, गीतांजली, सुपर डिलक्स आदी गाड्यांचा तिकीटविक्रीत समावेश आहे.
‘पेन्ट्री कार’ सुविधा मिळेल
मुंबई एक्सप्रेसमध्ये हल्ली अधिकृत खाद्य पदार्थ विक्री (पेन्ट्री कार) डबा नसून येत्या काही दिवसांमध्ये या गाडीला ही सुविधा मिळणार आहे. त्यादिशेने रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. पुष्पक एक्स्प्रेसचे (गाडी क्र. १२५३३/ १२५३४) डबे जोडले जाणार आहे. त्यानुसार रेल्वे विभागाने तयारी केली आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार अमरावती- मुंबई एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना पत्र दिले होते. त्यानुसार सहा डबे मंजूर करण्यात आले आहे. रेल्वेसाठी ही गाडी अतिशय फायद्याची ठरत आहे.
- आनंदराव अडसूळ,
खासदार, अमरावती.
मुंबईहून येतानाचे वेळापत्रक बदलणार
मुंबई- अमरावती एक्स्प्रेस गाडीचे मुंबईहून येताना वेळापत्रकात बदल होणार आहे. ही गाडी मुंबईहून रात्री १०.०५ मिनिटाने सुटणार असून सकाळी अमरावती रेल्वे स्थानकावर ९.०५ मिनिटानी पोहणार आहे. या गाडीच्या मुंबईकडे जाण्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नाही. दिल्ली येथील रेल्वे बोर्डाच्या कोचिंग व्यवस्थापक संचालकांनी अमरावती - मुंबई एक्सप्रेस गाडी २४ डब्याची करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पुष्पकर एक्सप्रेसला असलेल्या डब्याची रचना मुंबई एक्सप्रेसमध्ये राहणार असल्याने प्रवाशांना खाद्यपदार्थांसह आरक्षणाची सोयसुद्धा उपलब्ध होणार आहे.