‘मल्टियुटिलिटी रेस्क्यू व्हॅन’ खरेदीचा मुद्दा गाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:47+5:30
चौकशी अहवालात तत्कालीन उपआयुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, तत्कालीन अग्निशामन अधीक्षक भरतसिंह चौहान यांच्यावर ठपका ठेवला आहे. या प्रस्तावाला अंतिम मान्यता ही तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. त्यांना ही खरेदी थांबविता आली असती.

‘मल्टियुटिलिटी रेस्क्यू व्हॅन’ खरेदीचा मुद्दा गाजला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सेवानिवृत्त न्यायाधीश जी.एम. कुबडे यांनी मल्टियुटिलिटी रेस्क्यू व्हॅन खरेदी प्रकरणाचा चौकशी अहवाल महापालिकेला सादर केला होता. सदर चौकशी अहवालावर शुक्रवारी महापालिकेच्या आमसभेत चर्चा घडून आली. व्हॅन खरेदीच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता ही तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांनीच दिली. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल केला जावा तसेच महापालिकेची फसवणूक करणाऱ्या निधी एन्टरप्राइजेसला काळ्या यादीत टाकून संबधीतांवर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी सभागृहात लावून धरली. सभागृहासमोर ठेवलेला चौकशी अहवाल पीठासीन सभापती संजय नरवणे यांनी स्वीकारला.
चौकशी अहवालात तत्कालीन उपआयुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, तत्कालीन अग्निशामन अधीक्षक भरतसिंह चौहान यांच्यावर ठपका ठेवला आहे. या प्रस्तावाला अंतिम मान्यता ही तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. त्यांना ही खरेदी थांबविता आली असती. मात्र, त्यांनी दोन दिवसांतच देयके अदा केल्याचा नगरसेवकांचा सूर होता.
आचारसंहितेपूर्वीच्या आमसेभेवर सर्वांचे लक्ष लागले होते. नगरसेवक धीरज हिवसे यांनी तत्कालीन आयुक्त हेमंत पवार हे पहिल्या क्रमांकाचे दोषी ठरतात; त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला पाहिजे, अन्यथा महापालिकेत उपोेषण करू, असा इशारा दिला.
नेमकी काय अनियमितता झाली आणि दोषी कोण, यावर चर्चा व्हावी, असे मत नगरसेवक विलास इंगोले यांनी मांडले. त्यावेळी स्थायी सभापती कोण होते, हेही स्पष्ट करण्याची काही नगरसेवकांची मागणी होती. अजय गोंडाणे, प्रशांत वानखडे, नीलिमा काळे, बबलू शेखावत, सुनील काळे, दिनेश बूब, प्रणय कुलकर्णी यांनी कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. दोन कोटींचे वाहन आता ५० लाखांतही कुणी खरेदी करणार नसल्याचे बबलू शेखावत म्हणाले. अभ्यासपूर्ण चौकशी अहवालाचे कौतुक करीत मिलिंद चिमोटे यांनी ९२ नगरसेवकांचे सभागृह म्हणजे एक न्यायालयच असून, या प्रकरणात सावधगिरीने कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावा, असे सांगितले. दोन्ही बाजू तपासल्याशिवाय सभागृहाने निर्णय दिल्यास व त्याविरोधात कुणी न्यायालयात गेले, तर तो निर्णय कोर्टात टिकणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी पीठासीन सभापती तथा महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, आयुक्त संजय निपाणे, प्रभारी नगर सचिव नरेंद्र वानखडे यांची उपस्थित होेती.
महापालिका प्रवेशद्वारावर शिवसैनिकांची घोषणाबाजी
मल्टियूटिलिटी वाहन खरेदीचा चौकशी अहवाल शुक्रवारच्या आमसभेत चर्चेसाठी ठेवण्यात आल्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक प्रदीप बाजड यांना कळविले होते. मात्र, सकाळीच शिवसैनिकांनी प्रवेशद्वारापुढे कारवाईच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. हा मुद्दा आमसभेसमोर चर्चेला आल्याने आंदोलन करू नये, सभागृहातील निर्णयानुसार कारवाई होईल, असे आयुक्तांनी सांगितले. यावेळी प्रदीप बाजडसह संजय शेटे, दीपक लोखंडे, प्रमोद देशमुख, दिलीप काकडे, रवि कदम, दिलीप देवतळे यांनी घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
किती विहिरींमधील गाळ काढला?
विहिरींमधील गाळ काढण्यासाठी मल्टियूटिलिटी रेस्क्यू व्हॅन खरेदी करण्यात आली. ८० ते ९० लाखांना मिळणारी मशीन महापालिकेने २ कोटी ४ लाखांना घेतली. या मशीनचा उपयोग काय झाला व किती विहीरी स्वच्छ झाल्या, असा सवाल नगरसेवक बंडू हिवसे यांनी सभागृहात विचारला.