परतवाड्याच्या कुख्यात लल्ला ठाकुरवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई, वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध
By प्रदीप भाकरे | Updated: October 20, 2022 18:36 IST2022-10-20T18:34:40+5:302022-10-20T18:36:23+5:30
ग्रामीण पोलिसांच्या प्रस्तावावर प्रशासनाकडून शिक्कामोर्तब

परतवाड्याच्या कुख्यात लल्ला ठाकुरवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई, वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध
अमरावती : परतवाडा व अचलपूर या जुळ्या शहरातील लल्ला गँगचा प्रमुख कुख्यात गुंड सुरज उर्फ लल्ला कालिचरण ठाकूर (२७, रा. रवीनगर,परतवाडा) याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्या अंतर्गत त्याला एक वर्षासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिसांच्या प्रस्तावावर जिल्हा प्रशासनाने शिक्कामोर्तब केल्यानंतर २० ऑक्टोबर रोजी त्याला येथील कारागृहात पाठविण्यात आले.
सुरज उर्फ लल्ला ठाकूर याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न करणे, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासहित जबरी चोरी किंवा दरोडा घालणे, फौजदारी पात्र कट रचणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, दंगा करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, निनावी संदेशाव्दारे फौजदारी पात्र धाकदपटशा करणे, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याने परतवाडा तसेच अचलपूर शहरात लल्ला गँग नावाने टोळी तयार करून गुन्हे केले आहेत. त्याच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. परंतु, त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे सुरज ठाकूर याला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हादंडाधिकारी पवनीत कौर यांना सादर केला होता. त्यावर जिल्हादंडाधिकारी यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून सुरज ठाकूरला एक वर्षासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबतचा आदेश गुरुवारी पारित केला. आदेशावरून सुरजला कारागृहात त्यानबद्ध करण्यात आले. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, अमोल देशमुख, परतवाडा साहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी केली