आईला बिलगली अन् जिवाला मुकली! कपडे वाळत घालतानाची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 18:12 IST2022-04-05T18:07:18+5:302022-04-05T18:12:08+5:30
Amravati News कपडे वाळत घालताना लागलेल्या विजेच्या धक्क्याने एक महिला व तिची मुलगी अशा दोघीही जागीच ठार झाल्या.

आईला बिलगली अन् जिवाला मुकली! कपडे वाळत घालतानाची घटना
अमरावती : भातकुली तालुक्यातील खोलापूर येथे एक ३५ वर्षीय महिला कपडे वाळत घालत असताना तारांमध्ये विद्युत प्रवाह संचारल्याने या महिलेसह तिच्या तीनवर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना ४ एप्रिल रोजी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनेनंतर तेथे मोठा तणाव निर्माण झाला होता. त्याचवेळी कूलरमधील विद्युत प्रवाहाचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मंगळवारी खोलापूर पोलिसांनी कारण स्पष्ट केले. आईला बिलगल्याने चिमुकलीलादेखील प्राण गमवावे लागले.
नर्गिस अंजुम उमेर अहमद (३५) आणि आरेशा खानम उमेर अहमद (३, दोन्ही रा. खोलापूर) असे मृत आई व मुलीचे नाव आहे. नर्गिस अंजुम या सोमवारी दुपारी १.३०च्या सुमारास घरीच वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवत होत्या. कपडे धुतल्यानंतर ते कपडे घरातीलच तारेवर वाळत घालत असताना त्यांना अचानक जोरदार विद्युत शॉक लागला. यावेळी त्यांची मुलगी आरेशा बाजूलाच खेळत होती. आईला स्पर्श करताच आरेशालासुद्धा विद्युत शॉक लागला. यामध्ये दोघींचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तत्काळ खोलापूर पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
नेमके काय घडले?
कपडे वाळविण्याची तार अन् कूलरची तार एकमेकांना चिपकून होती. कूलरची तार एका ठिकाणी कट झाली. ती नेमकी कपडे वाळविण्याच्या तारेला स्पर्शून गेली. त्यामुळे कपडे वाळविण्याच्या तारेमध्ये विद्युत प्रवाह संचारला. घटनास्थळी खूप कमी जागा होती. तिची मुलगीदेखील तेथेच खेळत होती. आईला तळमळत असल्याचे पाहून चिमुकली आरेशा तिला बिलगली अन् क्षणात मायलेकीचा करूण अंत झाला.
विद्यत शॉकमुळे माय-लेकीचा मृत्यू झाला. याप्रकरणी ४ एप्रिल रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. डॉक्टरांनी मृत्यूचे कारण स्पष्टपणे नमूद केले. रात्रीच अंत्यसंस्कार पार पडले.
- संघरक्षक भगत, ठाणेदार, खोलापूर