नझुलच्या जागेची सर्रास विक्री
By Admin | Updated: June 30, 2016 00:02 IST2016-06-30T00:02:23+5:302016-06-30T00:02:23+5:30
स्थानिक दसरा मैदानामागील जागेत झोपड्या बांधून त्यांची सर्रास विक्री सुरू आहे. इतकेच नव्हे तर नझुलची रिकामी जागाही विकली जात आहे.

नझुलच्या जागेची सर्रास विक्री
दहा-पंधरा हजारांत विक्री : दसरा मैदानामागील शासकीय जागेवर कब्जा
अमरावती : स्थानिक दसरा मैदानामागील जागेत झोपड्या बांधून त्यांची सर्रास विक्री सुरू आहे. इतकेच नव्हे तर नझुलची रिकामी जागाही विकली जात आहे. अवघ्या महिनाभरात ही नवी झोेपडपट्टी तयार झाली असून उर्वरित जागेवर मनमानेल त्या पद्धतीने आखणी क रून ही जागा अवघ्या १० ते ५० हजार रूपये किमतीत विकली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेष म्हणजे या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे अद्याप लक्ष गेलेले नाही.
बडनेरा मार्गावरील दसरा मैदानाच्या देखभालीची जबाबदारी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाकडे आहे. सार्वजनिक कार्यक्रम तसेच दसरोत्सवादरम्यान खेळांच्या आयोजनासाठी या मैदानाचा उपयोग होते. मैदानालगतच सामाजिक वनिकरण विभागाची जागा आहे. त्याच्याच बाजूला पत्रकारांच्या निवासस्थानांसाठी असलेली आरक्षित जागा होती. मैदानाच्या दोन्ही बाजूने अधिकृत झोपडपट्ट्या आहेत. मात्र, तरीही मैदानामागील मोकळ्या जागेत आता नवीन झोपडपट्टी तयार झाली आहे.
वृक्षांची सर्रास कत्तल
अमरावती : महिनाभरात या झोपडपट्टीत तब्बल १५० ते २०० झोपड्या बांधून लोक राहायला देखील आले. तर काहींनी मोकळ्या जागेवर हवी तशी आखणी करून चार खांब गाडून स्वत:च्या नावाचे शिक्कामोर्तबही करून ठेवले आहे. आता त्या जागेची विक्री होत आहे. सद्यस्थिती १० ते ५० हजारांपर्यंत या जागांची विक्री केली जात आहे. या अनधिकृत झोपडपट्टीला वीजजोडणी सुद्धा देण्यात आली, हे विशेष. मात्र, अनधिकृत पद्धतीने तयार होणाऱ्या या नव्या झोपडपट्टीला अधिकृत वसंतराव नाईक झोपडपट्टीवासियांनी विरोध दर्शविला आहे. या बेकायदेशिर झोपडपट्टीची तक्रार महापालिकेकडे करण्याची तयार करणार आहे. दोन महिन्यातच या झोपडपट्टीचा विस्तार होत आहे. हळूहळू तेथे नागरिक वास्तव्यास येत आहेत. अद्याप हा प्रकार महापालिकेच्या लक्षात कसा आला नाही, हा संशोधनाचा विषय आहे. या मैदानासभोवताल सामाजिक वनिकरणामार्फत लावण्यात आलेल्या वृक्षांची झोपडपट्टीवासीयांनी कत्तल केली आहे. हा पर्यावरणाचा ऱ्हास आहे. मात्र, संबंधितांच्या डोळ्यांदेखल मोठाल्या वृक्षांची कत्तल सुरू असताना सगळेच गप्प का? असा सवाल उपस्थित होत आहे.