मोर्शीत दूरदर्शनवरील मराठी बातम्यांचे प्रसारण थांबविले

By Admin | Updated: August 4, 2015 00:09 IST2015-08-04T00:09:12+5:302015-08-04T00:09:12+5:30

स्थानिक लघु प्रक्षेपण दूरदर्शन केंद्राव्दारे प्रसारित करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक कार्यक्रमांतर्गत मराठी बातम्या प्रसारित केल्या जात नसल्यामुळे...

Morshiyit stopped broadcasting of Marathi news on Doordarshan | मोर्शीत दूरदर्शनवरील मराठी बातम्यांचे प्रसारण थांबविले

मोर्शीत दूरदर्शनवरील मराठी बातम्यांचे प्रसारण थांबविले

मोर्शी : स्थानिक लघु प्रक्षेपण दूरदर्शन केंद्राव्दारे प्रसारित करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक कार्यक्रमांतर्गत मराठी बातम्या प्रसारित केल्या जात नसल्यामुळे नागरिक दैनंदिन माहितीपासून वंचित राहत आहेत. एलपीटी केंद्राव्दारे प्रादेशिक केंद्राचे प्रसारण रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
मोर्शीला लघु प्रक्षेपण दूरदर्शन केंद्राची निर्मिती करण्यात आली. या केंद्राचा लाभ वर्धा जिल्ह्यातील आष्टी, मोर्शी, वरुड आणि चांदूरबाजार तालुक्यासह गाव खेड्यांतील नागरिक घेत आहेत. अनेक ठिकाणी खासगी वाहिन्यांकरिता छत्र्या किंवा केबल लावून घेण्यात आले असले तरी अजूनही बरेच नागरिक दूरदर्शन केंद्राव्दारे प्रसारित होत असलेले कार्यक्रम आणि बातम्यांचा लाभ घेत आहेत.
पूर्वी प्रादेशिक वाहिनीचे कार्यक्रम रात्रीच्या ८ वाजे पर्यंत प्रसारित केले जात असत. त्यामुळे ७ वाजताच्या राज्याच्या प्रादेशिक वाहिनीवरुन प्रसारित होत असलेल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचत असत आणि त्यामुळे राज्याशिवाय देश पातळीवरील घडामोडींची माहिती लोकांना होत असे. ८ वाजता राष्ट्रीय चॅनलचे प्रसारण सुरु होत असे. पूर्वी राष्ट्रीय चॅनलवरुन ८ वाजता इंग्रजी आणि नंतर हिंदीत बातम्या दिल्या जात असत; तथापि काही महिन्यांपासून रात्रीच्या ७ वाजतापासून स्थानिक एलपीटी केंद्राव्दारे राष्ट्रीय चॅनल सुरु केले जाते. त्यामुळे मराठीत प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्यांपासून नागरिक वंचित राहत आहेत.
याशिवाय राष्ट्रीय चॅनलवर रात्रीच्या ८ वाजता प्रसारित होणाऱ्या बातम्या आता बंद करण्यात आल्यामुळे नागरिक प्रादेशिक आणि राष्ट्रीय चॅनलवरील बातम्या पहावयास आतूर झाले आहेत. एकूणच देश-विदेश आणि राज्यातील घडामोडींच्या बातम्यांपासून नागरिक वंचित राहत आहेत. ही अडचण पाहता पूर्वीसारखे रात्रीच्या ८ वाजेपर्यंत प्रादेशिक सह्यांद्री केंद्राचे प्रसारण व्हावे, जेणे करुन कमीत कमी राज्याच्या घडामोडींची माहिती लोकांना मिळेल, अशी मागणी मोर्शीच्या लघु प्रक्षेपण दूरदर्शन केंद्रास केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Morshiyit stopped broadcasting of Marathi news on Doordarshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.