धामणगावात अर्धेअधिक शासकीय कार्यालये ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:01:32+5:30
सकाळी ११ वाजेपर्यंत मदतनीस व चौकीदार हे दोघेच उपस्थित होते. या कार्यालयात जवळपास १६ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. दोन कार्यालयाचा प्रभार असल्याचे सांगत जुना धामणगावच्या कार्यालयावर कार्यकारी अभियंत्यांनी तुळशीपत्रच ठेवले असल्याचे दिसले

धामणगावात अर्धेअधिक शासकीय कार्यालये ओस
मोहन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश काढले. मात्र अर्धेअधिक शासकीय कार्यालये सोमवारी ओस पडली होती. सकाळी ९.४५ वाजतापासून दुपारी १२ पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या खाली असल्याचा प्रत्यय सोमवारी आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अनेकांनी केराची टोपली दाखविली.
उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग तीन
येथील उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्रमांक तीन येथे सकाळी ११ वाजेपर्यंत मदतनीस व चौकीदार हे दोघेच उपस्थित होते. या कार्यालयात जवळपास १६ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. दोन कार्यालयाचा प्रभार असल्याचे सांगत जुना धामणगावच्या कार्यालयावर कार्यकारी अभियंत्यांनी तुळशीपत्रच ठेवले असल्याचे दिसले. येथील अनेक कर्मचारी आर्वी, वर्धा, यवतमाळ येथून अपडाऊन करतात. काही अभियंता धामणगाव शहरात कार्यालयात वेळेवर येत नाहीत, हे सोमवारी उघड झाले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय
तालुक्यातील अनेक शेतकरी सकाळी ११.१५ च्या सुमारास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आले. तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर, कृषी सहायक वालदे व एक चतुर्थश्रेणी कर्मचारी उपस्थित होता. या कार्यालयातील चार कर्मचारी बेपत्ता होते. नजीकच असलेल्या मंडळ कृषी अधिकारी क्रमांक एक व दोन मध्ये पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक अशा ३५ कर्मचाºयांनी सकाळी ११.२० वाजेपर्यंतही हजेरी लावली नव्हती. खरेदी-विक्री व्यवहार सुरू असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक के.के. राठोड हे सकाळी ९.३० वाजता लॉग इन करून घराकडे परतले होते.
तहसील कार्यालय निराधार
तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार हा विभाग पूर्णत: निराधार झाल्याचे दिसले. ११.३० वाजेपर्यंत एकही कर्मचारी तेथे उपलब्ध नव्हता. कनिष्ठ लिपिक उपलेखापाल कधी येईल, याची माहिती कार्यालयात नव्हती. या कार्यालयातील अनेक कर्मचारी यवतमाळ येथून अप-डाऊन करतात.
भूमी अभिलेख कार्यालय उपअधीक्षक राणे हे चांदूर रेल्वेला गेले, तर यवतमाळहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर मोबाईलवरूनच सुटीचा अर्ज पाठविला. त्यामुळे शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले.
महावितरण कार्यालय, नारगावंडी
नारंगावडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्या दुपारी बारापर्यंत रिकाम्याच होत्या. शनिवार, रविवार सुटी आल्याने येथील कनिष्ठ अभियंता अंकुश सोनवणे यांना अमरावतीहून येण्यास उशीर होईल, अशी माहिती मिळाली.
धामणगाव तीन जिल्ह्यांचे केंद्रबिंदू
धामणगाव रेल्वे हा तालुका अमरावती, यवतमाळ, वर्धा या तीन जिल्ह्यांचे केंद्रबिंदू आहे. अपडाऊनसाठी हा तालुका अधिक सोईस्कर असल्याने सर्व अधिकारी कर्मचारी या तालुक्याला पहिली पसंती दाखवितात. सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शासकीय कार्यालयाची वेळ असली तरी दुपारी १२ ला येणे अन् ४ ला जाणे, असा अनेकांचा रतिब आहे. कोरोनाच्या काळात आजही ६० टक्के अधिकारी, कर्मचारी अप-डाऊन करीत असल्याने धामणगाव शहरातील शासकीय कार्यालयांमधील विविध विभागांत खुर्च्या रिकाम्या दिसून आल्यात. या लेटलतीफीचा फटका ग्रामीण भागातून विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांना बसत आहे.