सुपरस्पेशालिटी २ मध्ये मॉड्युलर ‘ओटी’
By Admin | Updated: March 14, 2016 00:10 IST2016-03-14T00:10:54+5:302016-03-14T00:10:54+5:30
येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टप्पा २ च्या इमारतीत तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून मॉड्युलर ओटी (शल्यगृह) साकारले जाणार आहे.

सुपरस्पेशालिटी २ मध्ये मॉड्युलर ‘ओटी’
दोन कोटींचा खर्च : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश
लोकमत विशेष
प्रदीप भाकरे अमरावती
येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टप्पा २ च्या इमारतीत तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून मॉड्युलर ओटी (शल्यगृह) साकारले जाणार आहे.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील (सुपर स्पेशालिटी) टप्पा २ च्या इमारतीमधील मॉड्युलर शल्यगृहाचे नूतनीकरण करण्यासाठी १ कोटी ९० लाख ४१ हजार ५२० रुपयांच्या अंदाजपत्रकासह आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. गुरुवारी यासंदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीचा दुसऱ्या टप्पा सुरू झाल्यानंतर येथे विविध रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अमरावती विभागातील आरोग्य सेवेच्या दृष्टीने सुपर स्पेशालिटी रुग्णालय महत्त्वपूर्ण आहे. येथे अतिशय क्लिष्ट पद्धतीने मेजर आणि सुपरमेजर शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे तेथील उपचारांवर मर्यादा आली आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी टप्पा २ या इमारतीत अत्याधुनिक शल्यगृह उभारले गेल्यास मनुष्यबळाशिवाय ते कार्यान्वित होणार नाही. त्यामुळे टप्पा दोनमधील पदभरतीसह अत्याधुनिक यंत्रसामुग्री या इमारतीत केव्हा येईल, याकडे विभागीय यंत्रणेचे लक्ष लागले आहे. संदर्भसेवा रूग्णालयातील मॉड्युलर शल्यगृहाच्या नूतनीकरणासाठी आवश्यक रकमेची अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवेच्या संचालकांना शासनाकडे सादर करावा लागणार आहे.
पदभरतीसाठी रखडले कार्यान्वयन
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी पदस्थापना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार समितीला दिले होते. हिवाळी अधिवेशनादरम्यान स्थानिक आमदार सुनील देशमुख यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता. त्यावर एक महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असताना ३ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अद्यापही पदभरती झालेली नाही आणि त्यामुळे ४५ कोटी रुपये खर्च होऊनही ही वास्तू नागरिकांच्या आरोग्यसेवेत रुजू झालेली नाही.
२९० पदांची आवश्यकता
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारतीचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले आहे. इमारतीच्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. या रुग्णालयात साधनसामग्री आणि २९० पदनिर्मिती करावी लागणार आहे. पदनिर्मितीचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडून एकदा परत आला आहे. या हॉस्पिटलसाठी २० प्रकारची यंत्रसामग्री लागणार आहे. या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास आरोग्यसेवेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात हृदयरोग, कर्करोग उपचार
सुपर स्पेशालिटी टप्पा-२ मध्येही हृदयरोग उपचार, शस्त्रक्रिया विभाग, अतिविशिष्ट शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. सन २००८ मध्ये सुपर स्पेशालिटी रूग्णालय सुरू झाल्यापासून किडनीच्या आजारासह अन्य रोगांवरील उपचारांसाठी अमरावती विभागासह मराठवाडा, बैतुल व छिंदवाडा या जिल्ह्यातील रुग्णही येथे येतात. या पार्श्वभूमिवर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचा दुसरा टप्पा जनतेच्या सेवेत रुजू व्हावा, यासाठी राजकीय प्रयत्नांची गरज आहे.