वरूड-मोर्शीत डॉक्टर्सविरूद्ध आमदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:11 IST2020-12-26T04:11:04+5:302020-12-26T04:11:04+5:30
खासगी डॉक्टरांकडून सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारास नकार, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार वरूड : मोर्शी व वरूड तालुक्यातील खासगी रुग्णालये सर्वसामान्य रुग्णांवर ...

वरूड-मोर्शीत डॉक्टर्सविरूद्ध आमदार!
खासगी डॉक्टरांकडून सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारास नकार, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
वरूड : मोर्शी व वरूड तालुक्यातील खासगी रुग्णालये सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयएमए, खासगी डॉक्टर्स व आमदार समोरासमोर उभे ठाकले आहेत. संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याकरिता आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तक्रारीची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने अहवाल मागितला आहे. यामुळे खासगी डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे.
वरूड - मोर्शी तालुक्यातील खासगी रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णावर उपचार करण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. परिणामी सामान्य आजारांच्या रुग्णावर वेळेत उपचार होत नसल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता बळावली आहे. दोन्ही तालुक्यांतील सर्वसामान्य आजाराच्या रुग्णांवर उपचारास नकार देणाऱ्या खासगी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे, तसेच सामान्य आजाराच्या रुग्णांवर वेळीच उपचारा करण्याचे सुचवावे, अशी लेखी तक्रार आमदार देवेंद्र भुयार यांनी २८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटीस बजावून तक्रारीची दखल घेऊन नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
कोट १
कोरोना काळात रुग्ण परत केल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाºयांना पत्र लिहिले. खासगी डॉक्टरांची तक्रार करणे माझा उद्देश नव्हता. तर रुग्णावर वेळीच प्राथमिक उपचार होण्याकरिता जिल्हाधिकाऱ्याना सूचना दिली होती.
- देवेंद्र भुयार, आमदार
कोट २
आमदारांनी सप्टेंबरमध्ये केलेल्या तक्रारीवर आता माहिती मागविली गेली. आम्ही ती माहिती दिली. आम्ही रुग्ण सेवा करण्यास कटिबद्ध आहोत. आता कुठलाही वाद नाही.
डॉ. राजेंद्र राजोरिया
अध्यक्ष, आयएमए, वरूड
कोट ३
शासनाच्या दिशानिर्देशानुसार रुग्णालये बंद ठेवली. आयसोलेशन कालावधी संपल्यावर पुन्हा सुरु करून रुग्णसेवा अखंडित सुरू केली तरीसुद्धा तक्रारी करून डॉक्टरांचे मनोधर्य खचविण्याचा प्रक्रार होत असेल तर हे योग्य नाही.
- डॉ. प्रवीण चौधरी,
सचिव, आयएमए, वरूड
--------