'प्रयास'चे मिशन छत्री तलाव
By Admin | Updated: May 21, 2015 00:24 IST2015-05-21T00:24:59+5:302015-05-21T00:24:59+5:30
प्रयास संस्थेकडून निर्मल अमरावती अभियानांतर्गत मिशन छत्री तलाव स्वच्छता मोहिम मंगळवारपासून सुरु ..

'प्रयास'चे मिशन छत्री तलाव
स्वच्छता मोहीम : निर्मल अमरावती अभियानाला सुरुवात
अमरावती :प्रयास संस्थेकडून निर्मल अमरावती अभियानांतर्गत मिशन छत्री तलाव स्वच्छता मोहिम मंगळवारपासून सुरु करण्यात आली. प्रयास-सेवांकूरचे संचालक अविनाश सावजी यांच्यासह ५० ते ६० पदाधिकाऱ्यांनी छत्री तलावाच्या स्वच्छता मोहिमेत पुढाकार घेतला आहे.
शहरातील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या छत्री तलावात काडी-कचरा, मुर्त्यां, प्लास्टिक व अनावश्यक झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे स्वच्छता अभियानातून छत्री तलावाचे वैभव जपण्याचे कार्य प्रयास-सेवांकूरने सुरु केले आहे. भविष्यात पाणी टंचाईची समस्या जाणवू नये, शहर अधिक स्वच्छ, आरोग्यदायी बनावे. त्याकरिता नागरिकांनी एकत्रित येऊन स्वच्छतेचा वसा हाती घेतला पाहिजे. या उद्देशाने प्रयासचे अनिवाश सावजी यांनी मिशन छत्री तलाव चा उपक्रम हाती घेतला आहे.
श्रमदानातून सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत तलावाची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असून त्यामध्ये जवळपास १ ट्रक प्लास्टिक व १ ट्रक पीओपीच्या मूर्त्या गोळा करण्यात आल्या. येत्या रविवारपर्यंत रोज सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यानंतर दर रविवारी नियमित सुरु ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी अभियानाला महिला, पुरुष व युवकांनी प्रतिसाद दिला असून मार्निग वॉक करिता जाणारेही सहभागी झाले.
सेवांकूरचे अविनाश सावजी यांच्या नेत्तृत्वात गजानन ओक, नंदू गांधी, छोटू वरणगांवकर, राजू देव, अंजली देव, अश्विनी गुडधे, प्रशांत वानखडे, राजू महल्ले, कुमार बोबडे, विकास केमदेव, प्रशांत बोंडे, जयंत बल्लाळ, संजीव अढाव, विनोद देशमुख आदीनी छत्री तलाव स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला आहे.
महापालिकेनेही लावला हातभार
प्रयासतर्फे सुरु झालेल्या मिशन छत्री तलाव उपक्रमात महापालिका प्रशासनानेही हातभार लावला. आरोग्य अधिकारी सोनी व जाधव यांनी तलावातील प्लास्टिक गोळा करण्यात सहभाग नोंदविला. तसेच महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी तलावातील काडी-कचरा वेचण्यास मदत केली.