मिशन आनंद : घरापासून तुटलेल्या ज्येष्ठांची दिवाळी गाेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 05:00 AM2021-11-07T05:00:00+5:302021-11-07T05:01:00+5:30

भाऊबीजेच्या मुहूर्तावर शनिवारी वृद्धाश्रमातील वयोवृद्ध मंडळी नेहमीप्रमाणे पहाटे उठल्यानंतर परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर बोरसे कुटुंबीयांनी त्यांचे अभ्यंग स्नान घडविले. यानंतर दिवाळीचा फराळ देण्यात आला.  वर्षातून एकदा तरी आपल्याला मायेचा हवाहवासा स्पर्श होत आहे, या जाणिवेतून अनेकांना गहिवरून आले. त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. ते खचितच आनंदाश्रू होते.  

Mission Anand: Diwali gaade of seniors broken from home | मिशन आनंद : घरापासून तुटलेल्या ज्येष्ठांची दिवाळी गाेड

मिशन आनंद : घरापासून तुटलेल्या ज्येष्ठांची दिवाळी गाेड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ज्या घरात, कुटुंब-गोतावळ्यात हयात घालवली, त्यांच्यापासून तुटलेल्या, एकाकी जीवन जगत असलेल्या ज्येष्ठ वयोवृद्धांची दिवाळी वलगावातील संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात संत गाडगेबाबा मिशनने साजरी केली. वृद्धाश्रमात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठांनी या उपक्रमात  स्वत:ला हिरीरीने सहभागी करून घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर आंनद झळकत होता. 
भाऊबीजेच्या मुहूर्तावर शनिवारी वृद्धाश्रमातील वयोवृद्ध मंडळी नेहमीप्रमाणे पहाटे उठल्यानंतर परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर बोरसे कुटुंबीयांनी त्यांचे अभ्यंग स्नान घडविले. यानंतर दिवाळीचा फराळ देण्यात आला.  वर्षातून एकदा तरी आपल्याला मायेचा हवाहवासा स्पर्श होत आहे, या जाणिवेतून अनेकांना गहिवरून आले. त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. ते खचितच आनंदाश्रू होते.  
संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात १६ महिला व १४ पुरुष असे ३० वयोवृद्ध वास्तव्याला आहेत. काही जण स्वत: येथे आले आहेत. काहींना कुटुंबीयांनी आणून सोडले आहे. काही वृद्धांना पोलिसांनी येथे आणले. ते येथील कायमचे सदस्य झाले आहेत. कोरोनाकाळात येथे एकही रुग्ण वा संशयित आढळला नाही. संचालक कैलास बोरसे हे आता त्यांच्याच झालेल्या या कुटुंबाची काळजी घेत आहेत. त्यांच्या पुढाकाराने हा दिवाळी सोहळा पार पडला. दरम्यान, काही तासांच्या सोहळ्यादरम्यान आनंदाचे क्षण अनुभवत असलेल्या या मंडळींनी कटू आठवणी बाजूला ठेवल्या. 

अनुदानाची प्रतीक्षा 
घराने टाकलेल्या वृद्धांची काळजी घेणाऱ्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रमाला चार वर्षांपासून शासकीय अनुदान नाही. ११९६ पासून अस्तित्वात असलेल्या या संस्थेतच या कालावधीत ५२ जणांनी देह त्यागला. लोकांकडून मदत व काही सेवाभावी संस्थांचा निधी यावर आश्रमाचा कारभार आतापर्यंत सुरळीत सुरू आहे. मात्र, दैनंदिन खर्च वहन करण्यासाठी अनुदान हवे, अशी अपेक्षा डॉ. कैलास बोरसे यांनी व्यक्त केली.  

मी १९६४ पासून छायाचित्रणाचे काम केले. शहरातील अनेक नामवंत स्टुडिओमध्ये लोकांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलविण्याचे काम केले. मात्र, वृद्धावस्थेत कुटुंबीयांनी तुमचे तुम्ही पाहा, असे संगितले. काही दिवस रस्त्यावर काढले. अखेर काही छायाचित्रकारांनी येथे आणले. मी येथे समाधानी आहे. 
- रमेश व्यकंटराव गढमाळे

आपल्या आई-वडिलांचा घरीच सांभाळ करा. वृद्धाश्रमात आणण्याची वेळच येऊ देऊ नका. आणलेच तर त्यांना किमान भेटायला तरी नियमित येत जा. आम्ही येथे असलेल्या सर्व ज्येष्ठांची काळजी घेतो. लोकांनी वृद्धाश्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदविला पाहिजे.
- डाॅ. कैलास बोरसे, संचालक, 
संत गाडगेबाबा वृद्धाश्रम, वलगाव

 

Web Title: Mission Anand: Diwali gaade of seniors broken from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.