गौण खनिज तस्करांमध्ये धास्ती
By Admin | Updated: March 13, 2016 00:11 IST2016-03-13T00:11:27+5:302016-03-13T00:11:27+5:30
येथे नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी लाखो रुपयांचे गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांविरोधात धाडसत्र राबवून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

गौण खनिज तस्करांमध्ये धास्ती
महसूलची कारवाई : ८ महिन्यांत १२ लाख रुपयांचा दंड वसूल, धास्ती
वरुड : येथे नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी लाखो रुपयांचे गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांविरोधात धाडसत्र राबवून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. याला आळा घालण्यासाठी धडक मोहीम उभारून रात्री बेरात्री धाडसत्र राबविणे सुरू केले. यामध्ये आठ महिन्यात रेती, गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या ४९ वाहनांवर कारवाई करून १२ लाख १५ हजार २७ रुपयांची दंडाची रक्कम शासन तिजोरीत जमा झाली.
तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, या उद्देशाने आपले कार्य सुरू केले. १४ आॅगस्ट २०१५ रोजी वरुडच्या तहसीलदार पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांना तालुक्यात अवैध वृक्षतोड आणि गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे लक्षात आले.
एका फिरत्या पथकाची नेमणूक करून अवैध गौण खनिज आणि वृक्षतोडीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आठ महिन्यात रेती, गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या ४९ वाहनांवर कारवाई करून १२ लाख १५ हजार २७ रुपये दंडाची रक्कम शासन तिजोरीत जमा झाली. अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणात एवढी रक्कम कधीही शासन महसुली जमा झाली नाही, हे विशेष.
कारवाइने धास्तावलेले दगड, रेती, मुरूम वाहतुकीकरिता अधिकृत गौण खनिजाच्या वाहतुकीचे परवाने घेऊन वाहतूक करणाऱ्याकडूनसुध्दा रक्कम जमा झाली. सार्वजनिक कार्यालयात काम करताना सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, हा उद्देश मनाशी ठेवून आपले कार्र्य सुरू आहे. कुणालाही एक छदामचाही गैरप्रकार करू दिले जात नाही.
अवैध वृक्ष तोड असो की, गौण खनिज वाहतूक असो, वाहतूकदार कोणीही असला तरी मापदंड सर्वांकरिता सारखेच ठेवून कारवाई केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र गौण खनिज आणि वृक्ष तोड करणारे धास्तावले आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी या दबंग तहसीलदारांचे नाव जरी घेतले तरी अवैध धंदे करणाऱ्यामध्ये थरकाप उडतो, हे सत्य आहे. परंतु हा थरकाप त्यांच्या प्रामाणिकतेचा असून यांच्या मदतीला जिल्हाधिकारी किरण गित्ते आणि उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांचीसुध्दा साथ मिळत असल्याने गौण खनिज चोरट्यांना वठणीवर आणण्याचे काम करता येते. रात्रीसुद्धा महसूल विभागातर्फे गस्त सुरू असून येथील रेतीमाफियांवर दंडात्मक कारवाईची मालिका सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)