राज्यमंत्री, तीन आमदारांची राजकीय परीक्षा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:08+5:302021-09-19T04:14:08+5:30
अमरावती: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदासाठी निवडणूक ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातली आहे. राज्यमंत्री, तीन आमदारांनी या निवडणुकीत थेट ...

राज्यमंत्री, तीन आमदारांची राजकीय परीक्षा?
अमरावती: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदासाठी निवडणूक ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातली आहे. राज्यमंत्री, तीन आमदारांनी या निवडणुकीत थेट ‘एन्ट्री’ केल्यामुळे मोठी चुरस वाढली आहे.
सर्वपक्षीय नेते या निवडणुकीत आपसी राजकीय ‘काटा’ काढण्यासाठी जोमाने भिडल्याचे चित्र आहे. चांदूर बाजार, दर्यापूर तालुका सहकारी सोसायटीची निवडणूक ‘हाय व्होल्टेज’ होण्याचे संकेत आहेत.
राज्यमंत्री बच्चू कडू विरुद्ध बबलू देशमुख हे परंपरागत राजकीय वैरी आमने-सामने उभे ठाकले आहे. तर, दर्यापुरातून आमदार प्रकाश भारसाकळे विरुद्ध सुधाकर भारसाकळे अशी दोघा भावांमध्ये चुरस होणार आहे.
सुधाकर भारसाकळे यांच्याकडे सहकार क्षेत्राच्या प्रदीर्घ अनुभव असून, प्रकाश भारसाकळे यांच्या पाठीशी विधिमंडळाचा भक्कम अनुभव आहे. अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातून आमदार बळवंत वानखडे विरुद्ध आमदार राजकुमार पटेल अशा थेट लढतीचे चित्र आहे. ओबीसी मतदारसंघातून बबलू देशमुख विरुद्ध संजय खोडके अशी लढत होणार आहे, एकूणच ही निवडणूक सहकार अथवा राजकीय नेत्यांची परीक्षा घेणारी ठरणारी आहे. हल्ली या निवडणुकीच्या अनुषंगाने पॅनल गठनास विलंब होत असला तरी उमेदवारांनी प्रचाराला वेग आणला आहे. थेट मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला जात आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, अपक्ष अशी उमेदवारांची फळी मैदानात असणार आहे. मात्र, सहकार विरुद्ध परिवर्तन या दोन प्रमुख पॅनलमध्ये लढत होईल, असे संकेत आहेत.
--------------
दोन संचालकांसाठी १३ महिलांमध्ये स्पर्धा
दाेन महिला राखीव संचालकपदासाठी १३ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. त्यामुळे महिला उमेदवारांनी पॅनलमध्ये समाविष्ट होण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. एकंदरीत पॅनलच्या नेत्यांना महिला उमेदवारांची नावे जाहीर करताना दमछाक होणार आहे. माया हिवसे, मोनिका वानखडे (मार्डीकर), अरुणा गावंडे, कांचनमाला गावंडे, सुरेखा ठाकरे, प्रिया निकम, शभांगी वासनकर, वृषाली विघे, निवेदिता चौधरी, अरुणा गावंडे, वंदना चौधरी, वैशाली राणे, शारदा ठाकरे या १३ महिलांनी नामांकन दाखल केले आहे.