बांधकामाच्या खड्ड्यात कोसळले मिनिडोअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:28 IST2020-12-14T04:28:51+5:302020-12-14T04:28:51+5:30
पान २ चे लीड विठ्ठल मंदिरासमोरील पूल : यंत्रणेला मानवबळीची प्रतीक्षा, चालक गंभीर जखमी अंजनगाव सुर्जी : राज्य महामार्गावरील ...

बांधकामाच्या खड्ड्यात कोसळले मिनिडोअर
पान २ चे लीड
विठ्ठल मंदिरासमोरील पूल : यंत्रणेला मानवबळीची प्रतीक्षा, चालक गंभीर जखमी
अंजनगाव सुर्जी : राज्य महामार्गावरील विठ्ठल मंदिरासमोर पुलासाठी खोदून ठेवलेल्या खोल खड्ड्यात मिनिडोअर कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. मिनिडोअरच्या काचा फोडून चालकाला बाहेर काढण्यात आले. काही दिवसांपासून या ठिकाणी अपघाताची मालिका घडत असून, संबंधित यंत्रणेला मानवी बळीची प्रतीक्षा आहे का, असा संताप अंजनगाव सुर्जीवासीयांनी उपस्थित केला आहे. यापूर्वीही अनेक दुचाकीस्वार पूलबांधणीसाठी खोदून ठेवलेल्या या खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत.
अंजनगाव सुर्जी शहरातील मध्यवस्तीतून सातारा, बैतुलकडे महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम हे खुराणा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरू आहे. त्याला वेगदेखील आहे. मात्र, ऐन मुख्य रस्त्यावरील खोडगाव-देवगाव रोडवरील विठ्ठल मंदिरासमोरील पुलाचे बांधकाम आठ महिन्यांपासून रखडले आहे. पूलनिर्मितीसाठी त्या भागांत खोल खोदकाम करण्यात आले. मात्र, पुलाच्या बांधकामास मुहूर्त मिळालेला नाही. त्या खोदकामाशेजारी कंपनीकडून कुठलाही फलक लावण्यात आलेला नाही. तेथे लावण्यात आलेली दगडे केव्हाच त्या खोदकामात पडले आहेत. त्यामुळे ते खोदकाम जीवघेणे ठरत आहे.
यापूर्वीसुद्धा या जागेवर चार अपघात झाले. परंतु, अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. यंदा कामाला सुरुवात करताच विठ्ठल मंदिराच्या विश्वस्तांनी त्या पूल बांधकामास वैयक्तिक कारणावरून विरोध केला. ते काम नकाशात दर्शविल्याप्रमाणे होणार, असे वरिष्ठ अधिकारी व कंपनीकडून सांगितले गेले. मात्र, विशिष्ट व्यक्तींच्या मर्जीनुसार होत नसल्याने ते काम वेळोवेळी बंद पाडण्यात आले. याबाबत शहरातील मान्यवरांनी व नागरिकांनी मध्यस्थी केली. काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उपयोग झाला नाही. यामुळे तेथे आठ महिन्यांपासून कित्येक अपघात होत आहेत.
असा झाला अपघात
फुटपाथवर पिण्याचा सोडा विकणारे शरद घोगरे हे शनिवारी रात्री ११ च्या सुमारास आपल्या एमएच ०१ एनए ८१२० या मिनिडोअरने अजिजपुरा येथे घरी परत जात असताना, अचानक वाहन पुलाच्या खड्ड्यात कोसळले. नागरिकांनी गाडीमालक शरद घोगरे यांना वाहनाचे काच फोडून बाहेर काढले. जखमी अवस्थेत प्रथम ग्रामीण रुग्णालयात व पुढे अमरावती हलविण्यात आले. येथे प्राणांतिक अपघात झाल्यास जबाबदार कोण आणि बांधकाम यंत्रणेवर काम न करण्यासाठी दबाव कुणाचा, असा प्रश्न शनिवारच्या अपघाताने उपस्थित झाला आहे.
-----------------