बेरोजगारांची लाखोंनी फसवणूक
By Admin | Updated: March 13, 2016 00:27 IST2016-03-13T00:27:48+5:302016-03-13T00:27:48+5:30
शासकीय नोकरी मिळणे कठीण झाल्याने वाटेल त्या मार्गाने नोकरी मिळविण्याचे स्वप्न तरुणवर्ग पाहु लागला आहे.

बेरोजगारांची लाखोंनी फसवणूक
प्रकरण वनविभागातील नोकरीचे : तिघांविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल
पवनी : शासकीय नोकरी मिळणे कठीण झाल्याने वाटेल त्या मार्गाने नोकरी मिळविण्याचे स्वप्न तरुणवर्ग पाहु लागला आहे. अशा बेरोजगार तरुण-तरुणींना लुबाडणारेसुध्दा आहेत. असाच काहीसा प्रकार पवनी तालुक्यात घडला असून वन विभागात नोकरी देण्याचे आमिष देवून लाखो रुपयाने बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या तीन इसमांविरुध्द तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
वनविभागात रोजंदारीवर काम करणाऱ्यांना कायम नोकरीत समाविष्ठ करण्याचा शासन निर्णय झालेला आहे. अशी खोटी बतावणी करुन सन २०१४ मध्ये तालुक्यातील शंभरावर युवक-युवतींकडून दोन लाख रूपये अग्रीम दिल्यास सहा लाखात कायम नोकरी मिळेल असे सांगुन भामट्यांनी रक्कम वसुल घेतली व वनविभागात वनरक्षक, वनपाल, वाहनचालक या पदावर कायम करण्यात येईल अशी हमी दिली.
गेल्या वर्षभरात अनेकांनी जुगल किशोर चव्हाण (५३) रा. वर्धा, अशफाक अली अजगर अली (५०) रा. पद्मा वार्ड, पवनी व रवींद्र मधूकर डिब्बे (३४) रा. गोसेखुर्द यांचेसह संपर्क केला. परंतु त्यांनी टाळाटाळीचे धोरण सुरु केल्याने आपली फसवणूक झाल्याचे युवकांचे लक्षात आले.
फिर्यादी दीपक सत्यवान साखरे (३४) रा. गोसे यांनी २७/७/२०१४ ला जुगल किशोर चव्हाण, अशफाक अली अजगर अली व रविंद्र डिब्बे यांचेकडे सहा लाख रूपये रोख दिले. त्यावेळी प्रतिक्षा यादीमध्ये तुमचा नंबर लागेल त्यानंतर प्रशिक्षणाला जावे लागेल असे सांगितले होते. काही दिवसांनी ४५ व्या क्रमांकावर नाव असलेली यादी व बनावट आदेश तक्रारकर्त्यास देण्यात आला. हा आदेश पाहुन इतरांनी देखील उर्वरित रक्कम संबंधितांकडे दिली. परंतु कोणलाही नियुक्ती आदेश प्राप्त झाले नाही. त्यामुळे फसवणुक झाल्याची शंका आल्याने आदेशाची प्रत व प्रतिक्षा यादी वनविभागाचे अधिकाऱ्यांना दाखविली असता असा कोणताही शासन निर्णय किंवा नियुक्त्या नाही असे समजले. फिर्यादी दिपक साखरे यांचे तक्रारीवरुन पवनी पोलिसांनी जुगोल किशोर चव्हाण रा. वर्धा, अशफाक अली अजगर अली रा. पवनी व रविंद्र मधूकर डिब्बे रा. गोसे बुज यांचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. पोलीस निरीक्षक मधूकर गिते तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)