कोट्यवधी भंगारात
By Admin | Updated: October 9, 2015 00:57 IST2015-10-09T00:57:45+5:302015-10-09T00:57:45+5:30
पूर्वी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात समाविष्ट असलेल्या सिंचन विभागात सद्यस्थितीत अनेक वाहने भंगार अवस्थेत पडून आहेत.

कोट्यवधी भंगारात
घोटाळ्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट : लिलाव रखडल्याने चोरटे साधताहेत डाव
मनीष कहाते अमरावती
पूर्वी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात समाविष्ट असलेल्या सिंचन विभागात सद्यस्थितीत अनेक वाहने भंगार अवस्थेत पडून आहेत. सिंचन विभागात घोटाळा उघडकीस आल्यानंतर बंद अवस्थेत पडून असलेल्या वाहनांचा लिलाव करण्याबाबत अद्याप न्यायालयाचे आदेश मिळाले नसल्याने वाहनांची पार दुर्दशा झाली आहे. या वाहनांची ना दुरूस्ती झाली ना लिलाव. परिणामी या वाहनांचा एक-एक भाग काढून चोरट्यांनी त्याची विल्हेवाट लावली आहे. अनेक वाहनांचे केवळ सांगाडेच शिल्लक आहेत.
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागात सन १९९६ मध्ये २२ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. वाहनांच्या देखभालीचा अवास्तव खर्च दाखविल्यानेच हा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हापासून या विभागाच्या मालकीची कोट्यवधी रूपयांची चारचाकी वाहने आणि इतर मालमत्ता नांदगाव पेठ परिसरात भंगार अवस्थेत पडून आहे. जि.प.सिंचन विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता जवाहर दुबे आणि त्यांच्या समवेत विविध विभागाताली ९६ अधिकारी या २२ कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात अडकले होते. प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली. हा सिंचन घोटाळा जिल्हाभरातच नव्हे तर विदर्भातही गाजला. याप्रकरणी त्यावेळी संबंधितांविरूध्द भादंविच्या कलम ४२०, ४६७, ४७० आणि ३४ अन्वये गुन्हे दाखल झाले होते. या घोटाळ्यामध्ये सहभागी काही अधिकाऱ्यांचा आता मृत्यू झाला आहे. तर यापैकी काही अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासून या विभागाच्या अख्त्यारितील वाहने बिनकामी पडून आहेत.
सिंचन विभागातील अधिकाऱ्यांद्वारे त्यावेळी ठिकठिकाणचे विद्युत पंप, हातपंप दुरुस्तीची कामे करण्यासाठी अनेक चारचाकी वाहनांचा वापर केला जात होता.
एकाच वाहनाच्या दुरुस्ती आणि देखभालीवर संबंधितांनी वारंवार खर्च दाखविण्याचा प्रतापही त्यावेळी केला होता. हाच तो सिंचन विभागाचा २२ कोटींचा घोटाळा होय. हे प्रकरण त्यानंतर न्यायप्रविष्ट झाले. न्यायालयाकडे भंगार असलेले वाहने हर्रास करण्यासाठी वारंवार सिंचन विभागाने पत्रव्यवहार केला. परंतु न्यायालयाचा निकाल लागला नसल्याने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता धूळखात पडली आहे. त्यामध्ये ८ चेन टॅ्रक्टर, १५ ट्रक, ३२४ पंप सेट, ६२ मोटरपंप, २०४ टायर, ४ पाण्याच्या टाक्या यासह विविध वस्तुंचा समावेश आहे.
नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला लागून असलेल्या २ एकर जागेत हे भंगार साहित्य पडले आहेत. या जागेला तारेचे कुंपण आहे. तेही तुटलेले आहे.
मालमत्तेच्या देखरेखी करिता तीन चौकीदार तैनात आहेत. परंतु अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे चोरट्यांचे फावते आहे. शिवाय सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असल्याने येथे नियुक्त चौकीदार रात्रीच्या वेळी परिसरात गस्त करण्याचे धाडस करीत नाहीत.
कोट्यवधींची शासकीय मालमत्ता अशा प्रकारे निरूपयोगी पडून आहे. भंगार वाहनांचा एक तर लिलाव करावा किंवा त्यांच्या दुरूस्तीचे प्रावधान करावे, असा सूर उमटत आहे.