तरुणींकडून पुरुषांना मसाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:30 IST2019-06-05T01:30:25+5:302019-06-05T01:30:52+5:30
महिलांकडून पुरुषांची मसाज होत असल्याच्या प्रकाराचा विरोध करीत युवा स्वाभिमानच्या महिलांनी मंगळवारी नेक्स्ट लेव्हल मॉलमधील स्पा पॅलेसच्या फ्रेंचाईजीवर धडक दिली. अंबानगरीच्या संस्कृतीला गालबोट लावणारा हा प्रकार त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

तरुणींकडून पुरुषांना मसाज
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिलांकडून पुरुषांची मसाज होत असल्याच्या प्रकाराचा विरोध करीत युवा स्वाभिमानच्या महिलांनी मंगळवारी नेक्स्ट लेव्हल मॉलमधील स्पा पॅलेसच्या फ्रेंचाईजीवर धडक दिली. अंबानगरीच्या संस्कृतीला गालबोट लावणारा हा प्रकार त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. याप्रसंगी गाडगेनगर पोलिसांनी फ्रेंचाईजी घेणाऱ्या संचालकाजवळील दस्तावेजांची तपासणी सुरू केली होती.
गर्ल्स हायस्कूल चौकातील हॉटेल ग्रॅन्ड महफीलपुढील नेक्स्ट मॉलमध्ये स्पा पॅलेस नावाचे व्यापारी प्रतिष्ठान आहे. तेथे महिला व पुरुषांचा मसाज केला जातो. मसाजचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर २ हजार २५० रुपयांपासून तर ४ हजार ९९९ रुपयांपर्यंत आहेत. विशेष म्हणजे, स्पा पॅलेसमध्ये तरुणींकडून पुरुषांची मसाज केली जात असून, काही गैरप्रकारदेखील होत असल्याचे युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मंगळवारी युवा स्वाभिमानीच्या मीरा कोलटेके, संगीता काळपांडे, कोमल मानापुरे व चंदा लांडे यांनी स्पा पॅलेस या वातानुकूलित प्रतिष्ठानावर धडक दिली. यावेळी देखणी रिसेप्शनिस्ट काऊंटरवर बसलेली होती. महिला कार्यकर्त्यांनी थेट स्पा पॅलेसमधील खोल्यांची पाहणी केली. तीन खोल्यांपैकी प्रत्येक ठिकाणी मसाजासाठी बेड आढळले; मात्र ग्राहक एकही नव्हता. दरम्यान, एका खोलीत तीन तरुणी आढळल्या. त्या मणिपूर येथील असल्याची माहिती कार्यकर्तींना मिळाली. त्या तरुणी पुरुषांच्या मसाजासाठी असल्याचे निदर्शनास आले. तरुणींकडून पुरुषांना मसाज होत असल्याचा गंभीर प्रकार लक्षात घेता, युवा स्वाभिमानी पार्टीच्या महिला कार्यकर्त्या संतप्त झाल्या. अमरावती शहरात असले प्रकार चालू देणार नाही, अंबा नगरीच्या संस्कृतीला गालबोट लागल्यास याद राखा, असा इशारा त्यांनी तेथील संचालक सागर भट्टी यांना दिला. यावेळी गोंधळ पाहून संचालकांनी गाडगेनगर पोलिसांना कळविले.
पोलीस उपनिरीक्षक अमोल मुडे यांच्यासह पोलिसांचा ताफा स्पा पॅलेसमध्ये पोहोचला. पोलिसांनी संचालकास परवान्याबाबत विचारणा करून संबंधित प्रतिष्ठानाविषयीचे दस्तावेज मागविले.
३० ते ३५ कार्यकर्त्यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा
महिलाद्वारे पुरुषांचा मसाज असे गैरप्रकार चालू देणार नाही. त्यामुळे स्पा पॅलेस बंद करण्याची मागणी युवा स्वाभिमानी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्याची तक्रार संचालकातर्फे सोमवारी सायंकाळी गाडगेनगर पोलिसांत करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी युवा स्वाभिमानच्या ३० ते ३५ कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.
स्पा पॅलेसचा फ्रेंचाईजीचा माध्यमातून व्यवसाय करीत आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मान्यतेचा परवाना आमच्याकडे आहे. महिलांकडून पुरुषांची मसाज करण्यास मान्यता असल्याने आम्ही ते करीत आहोत.
- सागर भट्टी, संचालक, स्पा पॅलेस फ्रेंचाईजी
स्पा पॅलेस फ्रेंचाईजी संचालकाजवळ शॉप अॅक्ट, परवाना, करार असे सर्व कायदेशीर दस्तावेज आहेत. दस्तावेजातील अटी व शर्तींचे पालन करून ते व्यवसाय करीत असल्याचे दस्तावेजावरून दिसते.
- अमोल मुडे, पोलीस उपनिरीक्षक, गाडगेनगर ठाणे.