दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:09 IST2018-07-29T23:08:38+5:302018-07-29T23:09:46+5:30
कर्मयोगी स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या पुण्यस्मरण सोहळयादरम्यान अनेकांचे डोळे पाणावले. त्यांच्या करारीबाण्याचे अनेक अनुभव कथन करत मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. रविवारी मोर्शी मार्गावरील गुरुदेव प्रार्थना मंदिरात असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत झालेल्या दादासाहेबांच्या २१ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे ते वैशिष्ट्य ठरले.

दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतींना उजाळा
ठळक मुद्देएकविसावा पुण्यस्मरण सोहळा : जुन्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावले
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्मयोगी स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या पुण्यस्मरण सोहळयादरम्यान अनेकांचे डोळे पाणावले. त्यांच्या करारीबाण्याचे अनेक अनुभव कथन करत मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. रविवारी मोर्शी मार्गावरील गुरुदेव प्रार्थना मंदिरात असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत झालेल्या दादासाहेबांच्या २१ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे ते वैशिष्ट्य ठरले.
स्व. दादासाहेब काळमेघ स्मृति प्रतिष्ठानातर्फे आयोजित हा सोहळा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर, खा. आनंदराव अडसूळ, अकोल्याचे आ. रणधिर सावरकर, दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ, माजी आ. नरेशचंद्र ठाकरे, रामचंद्र शेळके, केशवराव गांवडे, केशव मेटकर, अशोक ठुसे, माजी मंत्री वसुधा देशमुख शशी खोटरे, बबनराव चौधरी उपस्थित होते. दीप प्रज्ज्वलन व दादासाहेबांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनिल काळे यांच्या आदंराजली गीताने उपस्थिताना भारावून टाकले होते. मान्यवरांचे स्वागत संजय देशमुख, रविकिरण बढे, राजेंद्र तायडे, राजेंद्र कदम, अशोक साबळे, नरेश पाटील, ओंकार बंड, गजानन भारसाकळे यांनी केले. प्रास्तविक भाषणात गजानन भारसाकळे यांनी दादासाहेब काळमेघ यांच्या जीवनाकार्यावर प्रकाश टाकला. मान्यवरांनी मनोगतांमधून दादासाहेब काळमेघ यांचे जीवनचरित्र मांडले. दादासाहेब काळमेघ यांचे समाजाप्रतीचे कार्य, त्यांच्या आठवणी, त्यांचे विचार, शिक्षणसेवेतील त्यांचे कार्य आदी गोष्टींवर मान्यवरांनी प्रकाश टाकला. या सोहळ्याचे संचालन मंदा नांदुरकर व आभार राजेंद्र तायडे यांनी मानले. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असताना दादासाहेबांच्या कार्याला उजाळा मिळाला.
नागपूर विद्यापीठाचा मुद्दा गाजला
दादासाहेब काळमेघ यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम दरवर्षी नागपूर विद्यापीठात व्हायचा. मात्र, यंदा नागपूर विद्यापीठाने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. या मुद्यावर उपस्थित मान्यवरांनी मत मांडून नागपूर विद्यापीठ प्रशासनावर रोष व्यक्त केला. हा हेतूपुरस्सर निर्णय असल्याचे मत बबन चौधरी यांनी व्यक्त केले. दादासाहेब नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु होते. २० वर्षांपासून चालत असलेल्या पुण्यस्मरण कार्यक्रमाला परवानगी नाकारणे हे कितपत योग्य असल्याचा सवाल त्यांनी केला. पुढच्या वर्षी नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात दादासाहेबांचा पुण्यस्मरण सोहळा घेऊ, अशी भूमिका गजानन भारसाकळे यांनी मांडली. 'लोकमत'ने याबाबत प्रकाशित केलेल्या लेखाचे मान्यवरांनी कौतुक केले.
प्रशांत कोल्हेंचा सन्मान
कर्मयोगी दादासाहेब काळमेघ यांचे छायाचित्र हाताने हुबेहुब साकारणारे प्रशांत कोल्हे यांचा या पुण्यस्मरण सोहळ्यात सन्मान करण्यात आला. शरद काळमेघ यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन कोल्हे यांचा गौरव करण्यात आला.
धाडसी व्यक्तिमत्त्वाचे दादासाहेब : केशव मेटकर
दातृत्वाचे धनी असणाऱ्या दादासाहेबांचे धाडसी व्यक्तीमत्व मी अनुभवले. त्यावेळच्या सुवर्णकाळात दादासाहेबांचे विचार व धाडस वाखाणण्याजोगेच होते. त्यांनी एकदा स्वातंत्र्यदिनापूर्वीच्या मध्यरात्री १२.१० मिनिटांनी झेंडावंदन करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही त्यांच्यासोबत झेंडावंदन केले, अशी आठवण केशव मेटकर यांनी सोहळ्यादरम्यान उपस्थितांसमोर काढली.
नागपूर विद्यापीठाची मस्ती जिरवू : रणधिर सावरकर
ज्या विद्यापीठाचे दादासाहेब कुलगुरु होते, तेच विद्यापीठ आज कार्यक्रमाला परवानगी नाकारत असेल, तर आम्ही तो मुद्दा हाताळू, विद्यापीठ प्रशासनाला मस्ती आली असेल, तर आम्ही ती उतरुन टाकू, असा इशारा आ. रणधिर सावरकर यांनी दिला. विद्यार्थी दशेत असतानाचे अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.
वादळी व्यक्तिमत्त्व : हर्षवर्धन देशमुख
दादासाहेब काळमेघ वादळी व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगतात केले. १९८७ ते १९९२ कालखंडात मी शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत होतो. दादासाहेबांच्या अनेक वादळी आठवणी माझा मनात आहेत. वादळी आणि करारीबाण्याचे दादासाहेब कायद्याच्या चाकोरीत न बसता त्यांना पटेल, तेच काम करायचे आणि काम करवून घेण्याची क्षमता ते ठेवायचे. आम्हाला न जुमानता त्यांना जे हवे तेच ते करीत होते. यातून देशमुख यांनी दादासाहेबांच्या वादळी व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे अधोरेखित केले.
युवा पिढीने प्रेरणा घ्यावी : राजेश जयपूरकर
दादासाहेब काळमेघ यांचा सर्वसामान्य विद्यार्थी ते कुलगुरुपर्यंतचा प्रवास सर्वांसमोर आहे. दादासाहेबांनी समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले. शिक्षणाप्रती असलेली तळमळ, धार्मिक, आध्यात्मिक व विज्ञानवादी विचार हे त्यांचे गुणविशेष होते. दादासाहेब विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. कुशल नेतृत्वशैली असणाºया दादासाहेबांचे कार्य व विचारांचा अभ्यास करून आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर यांनी केले.
दादासाहेबांचा करारीबाणा आठवणीत : खा. अडसूळ
दादासाहेब काळमेघ व माझा संबध १९९५ मध्ये आला. त्यांची वेशभूषा व करारीपणाने मी भारावून गेलो होतो. अक्षरश: त्यांच्या प्रेमात पडलो. घरी येणे-जाणे सुरु झाले. तेच गुण दादासाहेबांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांमध्ये वारशाने आले आहेत. शरद व हेमंत काळमेघ यांनी त्यांचा वारसा कायम ठेवून समाजाप्रती बांधिलकी जोपासली आहे. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व दादासाहेब काळमेघ यांचे व्यक्तिमत्त्व एकसमान होते. त्यांच्या करारीवृत्तीची आठवण आजही स्मरणात असल्याचे खा. आनंदराव अडसूळ म्हणाले.
शरद काळमेघ यांचे डोळे पाणावले
दादासाहेब गेल्यानंतर माझे व हेमंत यांचे छत्र हरविले, एप्रिल १९७८ ला दादासाहेब यांनी ४५ व्या वर्षीय कुलगुरुपद भुषविले. त्यांची मित्रमंडळी आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहे. प्रत्येक गोष्टीत संवेदनशील कार्य करणाºया दादासाहेबांच्या पुण्यस्मरण सोहळ्याला विद्यापीठाने परवानगी नाकारली. ही खंत व्यक्त करीत शरद काळमेघ यांनी वडिलांच्या आठवणींचे अनेक पदर उलगडले. वडिलांप्रती असलेला जिव्हाळा व्यक्त करत असताना अखेरच्या क्षणी शरद काळमेघ यांचे डोळे पाणावले.