मेळघाट जलमय, चार तालुक्यांत अतिवृष्टी; १७० गावांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 21:51 IST2019-08-09T21:51:32+5:302019-08-09T21:51:46+5:30
तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे सपन, पूर्णा, चंद्रभागा व शहानूर या चारही प्रकल्पांची दारे उघडण्यात आली.

मेळघाट जलमय, चार तालुक्यांत अतिवृष्टी; १७० गावांचा वीजपुरवठा खंडित
अमरावती : सलग दुस-या दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे मेळघाट जलमय झाला आहे. मागील २४ तासांत मेळघाटातील चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यात अनुक्रमे ११४.६ व १०१.६ मिमी पाऊस झाला. याशिवाय मोर्शी व चांदूर बाजार या तालुक्यांतही अतिवृष्टीची नोंद झाली. ९ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात सरासरी ६५ मिमी पाऊस पडल्याने जिल्ह्याने या हंगामात पहिल्यांदाच अतिवृष्टी अनुभवली. शिवाय ३४ महसूल मंडळांत ६५ मिलीमीटरच्यावर पाऊस झाला.
तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे सपन, पूर्णा, चंद्रभागा व शहानूर या चारही प्रकल्पांची दारे उघडण्यात आली. तसेच चंद्रभागा, शहानूर, सपन, चारघड, तापी, गडगा, खंडू व बिच्छन या नद्यांना पूर आला. सलग दुस-या दिवशी मेळघाटात अतिवृष्टी झाल्याने सिपना, तापी, गडगा या तीन नद्यांवरील पूल पाण्याखाली आल्याने ४० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला, तर मांडवा ते धारणी दरम्यान ३३ केव्ही विद्युत वाहिनीच्या तारा खांबासह कोसळल्याने चिखलदरा व धारणी तालुक्यातील ३०१ गावांपैकी सुमारे १७० गावांची वीज खंडित झाली. मागील २४ तासांत सुमारे २३३ घरांची अंशत: पडझड झाली, तर धारणी तालुक्यातील सिपना नदीत एक बैल वाहून गेला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.