मेघे अभियांत्रिकी यूजीसीच्या नॅक ‘अ’ श्रेणीत
By Admin | Updated: May 4, 2017 00:08 IST2017-05-04T00:08:34+5:302017-05-04T00:08:34+5:30
बडनेरा येथील राम मेघे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्चला बंगळुरूच्या राष्ट्रीय अधिस्वीकृती परिषद (नॅक) ने ‘अ’ श्रेणी बहाल केली आहे.

मेघे अभियांत्रिकी यूजीसीच्या नॅक ‘अ’ श्रेणीत
अमरावती विद्यापीठांतर्गत पहिला बहुमान : एनबीए आणि नॅक दोघांचेही मानांकन
अमरावती : बडनेरा येथील राम मेघे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्चला बंगळुरूच्या राष्ट्रीय अधिस्वीकृती परिषद (नॅक) ने ‘अ’ श्रेणी बहाल केली आहे. मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत एनबीए आणि नॅक अशी दोन्ही मानांकने प्राप्त करणारे पहिले महाविद्यालय ठरल्याची माहिती संस्थाध्यक्ष नितीन धांडे यांनी पत्रपरिषदेतून दिली.
नितीन धांडे यांच्या माहितीनुसार, बंगळुरुच्या राष्ट्रीय अधीस्वीकृती परिषदेने (नॅक) मंगळवारी जाहीर केलेल्या मानांकनाच्या यादीत राम मेघे अभियांत्रिकीला ३.१२ च्या गुणदानासहित ‘अ’ श्रेणी बहाल केली आहे. त्यामुळे मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षणाचा दर्जा हा आता सातासमुद्रापलिकडे पोहोचेल, असा दावा धांडे यांनी केला. ‘नॅक’ अधिस्वीकृती मिळालेल्या यादीत राज्यातील १२ महाविद्यालयांपैकी सर्वाधिक गुणदान मिळविण्याचा बहुमान मेघे अभियांत्रिकीने पटकाविला आहे.‘नॅक’चे निकष आणि ३२ पॅरामीटरची शर्यत महाविद्यालयाने पूर्ण केली आहे. यूजीसी नॅक ‘अ’ श्रेणी मिळाल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेसह, दर्जावरही आता शिक्कामोर्तब झाल्याचे धांडे म्हणाले. पुणे, मुंबईकडील महाविद्यालयांच्या शर्यतीत मेघे अभियांत्रिकीने मिळविलेला बहुमान प्राचार्य, प्राध्यापकांच्या परिश्रमाचे फळ आहे. देशातील नावाजलेल्या तीन शिक्षणतज्ज्ञांमार्फत महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली होती. महाविद्यालयाने निकष पूर्ण केल्याची खातरजमा केल्यानंतर ‘अ’ श्रेणी महाविद्यालयाला बहाल करण्यात आली आहे. तज्ज्ञ प्राध्यापक, रोजगार मेळावे, विद्यार्थी संख्या ही बाब देखील बहुमान वाढविणार असल्याचे धांडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला विनय गोहाड, पंकज देशमुख, युवराजसिंह चौधरी, हेमंत देशमुख, उदय देशमुख, नितीन हिवसे, रागिणी देशमुख, प्राचार्य निशिकांत काळे आदी उपस्थित होते.
नॅक ची ‘अ’ श्रेणी प्राप्त करून महाविद्यालयाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ३४ वर्षांत महाविद्यालयाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन वाटचाल सुरु केली. अखेर राष्ट्रीय मानांकन परिषदेने दखल घेतली.
- नितीन धांडे, अध्यक्ष, विदर्भ युथ वेलफे अर सोसायटी.