त्यांनी काठ तुटलेल्या पुलावरुन रुग्णवाहिका नेली, गर्भवतीचे प्राण वाचवले; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 07:56 PM2019-07-30T19:56:27+5:302019-07-30T19:57:51+5:30

आरोग्य यंत्रणेच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक

medical staff saved pregnant woman's life in amravati | त्यांनी काठ तुटलेल्या पुलावरुन रुग्णवाहिका नेली, गर्भवतीचे प्राण वाचवले; पण...

त्यांनी काठ तुटलेल्या पुलावरुन रुग्णवाहिका नेली, गर्भवतीचे प्राण वाचवले; पण...

Next

- पंकज लायदे

धारणी : रुद्रावतार धारण केलेल्या सिपना नदीवरील काठ तुटलेल्या पुलावर पुराच्या पाण्यातून रुग्णवाहिका काढून गर्भवतीला वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात आले. मात्र या महिलेने मृत बालकाला जन्म दिला. तथापि, तिची प्रकृती सुधारत आहे. या धाडसाबद्दल बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय चमूचे कौतुक होत आहे. 

प्राप्त माहितीनुसार, पाटिया गावातील जमुना उमेश मावस्कर (२४) या नऊ महिन्यांच्या गर्भवतीला सोमवारी सकाळी ११ वाजता प्रसूतिकळा सुरू झाल्या. तिची प्रकृती  चिंताजनक झाली होती. तेथील आशाने बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून माहिती दिली. परंतु संततधार, पावसामुळे सिपना नदीच्या पुराने दिया गावाजवळील दिया-बैरागड व उतावली-पाटिया मार्गावरील दोन्ही वाहतुकीचे पूल खचले व त्यावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी सायंकाळी पाचपर्यंत वाहत होते. त्यामुळे जमुनाला उपचाराकरिता धारणीला आणणे कठीणच होते. आशाने गावातील ऑटोरिक्षा भाड्याने घेऊन निरगुडी मार्गे चटवाबोडपर्यंत तिला पोहोचवले व तिकडून बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका चटवाबोड गावापर्यंत पोहोचली. बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. प्रणित पाखरे यांनी तिच्यावर उपचार केले. तरीसुद्धा तिची प्रकृती चिंताजनकच होती. त्यामुळे रात्री ८ वाजता तिला धारणीला हलवण्याच्या हालचाली डॉक्टरांनी सुरू केल्या. 

वैद्यकीय चमूचे अचाट धाडस
बैरागड येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सायंकाळी धारणी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हकिकत सांगितली. सिपना नदीच्या पुलापलीकडे रुग्नवाहिकेने गर्भवतीला आणा, असे निर्देश मिळाले. सदर महिला व डॉक्टरांची चमू रुग्णवाहिकेने बैरागडवरून दिया गावाजवळ असलेल्या पुलाच्या अलीकडे येऊन थांबले. धारणीत असलेले डॉ. नीलेश भालतिलक, डॉ. राखी बरवट, डॉ. जयश्री नवलाखे आणि रुग्णवाहिका चालक मनीष चौरे व सचिन जवरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर माहिती दिली. दिया येथील पुलाच्या एका बाजूला दगड वगैरे टाकून चिंचोळ्या जागेतून रुग्णवाहिका पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून पलीकडे नेली. तेथेसुद्धा पूल खचलेलाच होता. तिकडून आलेल्या रुग्णवाहिकेतून उतरवून जमुनाला या रुग्णवाहिकेत टाकले आणि पुन्हा तीच तारेवरची कसरत करत वाहत्या पाण्यातून रुग्णवाहिका काढली. 

मृत अर्भकाला दिला जन्म
धारणी उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आलेल्या जमुनावर तेथे कार्यरत वैद्यकीय चमू डॉ. अमोल डवंगे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नालट, डॉ. ठाकरे परिचारिका प्रज्ञा इंगोले यांनी तात्काळ  उपचार सुरू केले. तिने मृत अर्भकाला जन्म दिला. तथापि, जमुनाची प्रकृती सुधारत आहे.
 

Web Title: medical staff saved pregnant woman's life in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.