लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नीट परीक्षेचा निकाल लागून महिनाभराचा कालावधी उलटला असला तरी एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला मात्र अजूनही सुरुवात झालेली नाही. तीन वेळा प्रवेशाचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. जिल्ह्यात गत वर्षभरापूर्वी सुरू झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपले द्वितीय वर्षासाठी सज्ज आहे. द्वितीय वर्षाच्या अनुषंगाने आवश्यक वसतिगृह भाड्याने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच बरोबर द्वितीय वर्षासाठी मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, फार्माकोलॉजी व फॉरेन्सिक मेडिसिन हे चार विभागाच्या अनुषंगाने किरकोळ दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला २०२४-२५ चे शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेशासाठी मान्यता एनएमसीने दिली होती. त्यामुळे प्रथम वर्षाला १०० विद्यार्थी प्रवेशित झाले होते, हे द्वितीय वर्षासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. एमबीबीएसच्या द्वितीय वर्षासाठी मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, फार्माकोलॉजी व फॉरेन्सिक मेडिसिन विभागासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वापरात नसलेल्या प्री-फॅब बॅरेक्स उपयोगात आणण्यात येत आहेत, तर वसतिगृहासाठी इमारतींचा शोध सुरू आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश सुरुवातीला १ ऑगस्टपासून सुरू होणार होते; परंतु काही कारणास्तव ही तारीख पुढे ढकलून सुरुवातील ४ ऑगस्टनंतर ७ ऑगस्ट करण्यात आली; परंतु ५ ऑगस्टला प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एमएससीने नव्याने परिपत्रक काढण्यात आले असून पुन्हा एकदा तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.
"एमबीबीएसच्या द्वितीय वर्षासाठी तयारी सुरू केली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वसतिगृह भाड्याने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, फार्माकोलॉजी व फॉरेन्सिक मेडिसिन विभागासाठी प्री-फॅब बॅरेक्समध्ये होत आहे. प्रवेश प्रक्रियेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील लवकरच सूचना प्राप्त होतील."- डॉ. किशोर इंगोले, अधिष्ठाता, अमरावती मेडिकल कॉलेज