बाजार समितीच्या निवडणुकीत मतांच्या जोडतोडीला सुरूवात
By Admin | Updated: September 13, 2015 00:11 IST2015-09-13T00:11:45+5:302015-09-13T00:11:45+5:30
स्थानिक बाजार समितीची मतदानाची वेळ अवघ्या ७२ तासांवर येऊन ठेपली आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत मतांच्या जोडतोडीला सुरूवात
पैशांवर बसणार मतांचा मेळ : निवडून या, नेत्यांचा उमेदवारांना आदेश
चांदूरबाजार : स्थानिक बाजार समितीची मतदानाची वेळ अवघ्या ७२ तासांवर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यासाठी बाजार समितीवर आपला झेंडा चढविण्यासाठी सर्वांनीच प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यात आपले वर्चस्व आहे, हे दाखविण्याकरिता नेते मंडळींनी उमेदवारांना काहीही करा, पण निवडून या, असे आदेश दिले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून गुप्त बैठकांना वेग आला असून मतांच्या जोडतोडीला सुरुवात झाली आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत आचारसंहितेचे कोणतेही बंधन नसल्यामुळे प्रचारादरम्यान खर्चास निर्बंध नाही व त्याचा हिशेब द्यावा लागत नाही. परिणामी मतांच्या जुगारासाठी रुपयांची मोठी खेळी खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा पैशाचा खेळच मतांचा मेळ बसविणार असे दिसून येते.
तालुक्याच्या राजकारणातील एकेकाळच्या काँग्रेसी व आजच्या राष्ट्रवादीत असलेल्या वसुधा देशमुख या बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनेलमध्ये बसल्या तरी त्या याठिकाणी समाधानी असल्याचे दिसून येत नाही. शुक्रवारी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची व त्यांच्याजवळील मतदारांची एक गुप्त मिटींग शिरजगाव बंड येथे घेतल्याचे कळते. या सभेत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना व मतदारांना प्रहारकडे जाण्याची मूक संमती दिल्याची माहिती मिळाली आहे. यावरून श्रीमती तार्इंनी बबलु देशमुखांच्याविरुद्ध बच्चू कडूंना मदत करण्याची परंपरा यावेळीही कायम ठेवली असल्याचे त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या चर्चेवरून कळते.
सुरेखा ठाकरे यांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे आपल्याजवळ बाजार समितीकरिता किती मतदार आहेत याचा अंदाज सुरेखातार्इंना न आल्याने त्या सध्या तळ्यात की मळ्यात ही स्थिती आहे.
सहकार पॅनेलमध्ये भाजपनेते ही लढाई जिंकण्यासाठी सर्वशक्तीनिशी मैदानात उतरले आहे. परंतु त्यांची शक्ती सीमित असल्यामुळे त्याचा सहकार पॅनेलला किती फायदा होईल, हे सांगता येत नाही. प्रहार शेतकरी पॅनेलमध्ये आयात केलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. प्रहार शेतकरी पॅनेलमध्ये सर्वकाही आॅल ईज वेल आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु प्रहार नेत्यांची सर्वांना जागेवर बसविण्याची हातोटी शेवटच्या क्षणी उपयोगी पडू शकते. तरीही या निवडणुकीत क्रॉस व्होटींग होण्याची शक्यता सर्वाधिक असल्यामुळे आपल्या पॅनेलच्या विजयाची खात्री कोणालाच देता येत नाही. (शहर प्रतिनिधी)