हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पसंत नसेल, तर दुसरी बायको कर.. सासरच्यांकडून पतीला चिथावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 16:15 IST2022-05-02T15:57:36+5:302022-05-02T16:15:40+5:30

सासू, सासरा, दीर, नणंद व तिचा पतीदेखील आशिष सरोदेला समजावून सांगण्याऐवजी त्याला चिथावणी दिली.

Marital harassment for dowry, charges filed against six people | हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पसंत नसेल, तर दुसरी बायको कर.. सासरच्यांकडून पतीला चिथावणी

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पसंत नसेल, तर दुसरी बायको कर.. सासरच्यांकडून पतीला चिथावणी

ठळक मुद्देसहा जणांविरुद्ध गुन्हे

अमरावती : माहेरहून पैसा आणण्याचा तगादा लावून पत्नीचा अनन्वित छळ करणाऱ्या मुलाला समजावण्याऐवजी तुला पसंत नसेल, तर दुसरी बायको कर, असे भडकाविणाऱ्या सासू, सासरे, दीर, नणंद व नणंदेच्या पतीविरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत त्या विवाहितेने १ मे रोजी दुपारी तक्रार नोंदविली होती.

नांदगाव तालुक्यातील एका तरुणीचा जुलै २०१९ मध्ये आशिष सरोदे याच्याशी विवाह झाला होता. आशिष हा दारूच्या आहारी गेला असून, त्याच्या अंगावर कर्जदेखील आहे. ते कर्ज फेडण्यासाठी त्याने पत्नीला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला; मात्र, माहेरची परिस्थिती यथातथा असल्याने तिने नकार दिला. त्याने तिला मारहाणदेखील केली. सासू, सासरा, दीर, नणंद व तिचा पतीदेखील आशिष सरोदेला समजावून सांगण्याऐवजी त्याला चिथावणी दिली. कर्ज फेडण्यासाठी तिच्या वडिलांकडून पैसे माग आणि तुला पसंत नसेलच तर दुसरा विवाह कर, असे त्याला भडकावत होते. नणंद व तिचा पती देखील अधूनमधून माहेरी येत आरोपी आशिषला तिच्याविरुद्ध भडकावत राहायचे.

मोपेड घेतली, गहाण ठेवली

तक्रारकर्त्या विवाहितेला तिच्या वडिलांनी मोपेड घेऊन दिली. ती पण आरोपी आशिष सरोदे याने गहाण ठेवली. त्यानंतर माहेरहून ३० हजार रुपये आण, असा तगादा लावून तिला मारहाण केली. २० मार्च २०२१ ते ३ ऑक्टोबर २०२१ दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नांदगाव पोलिसांनी आशिष सरोदे (३२), डिगांबर सरोदे, शुभम सरोदे (सर्व रा. राजुरा), दोन महिला व प्रमोद साठे यांच्याविरुद्ध कलम ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Marital harassment for dowry, charges filed against six people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.