अल्पसंख्यक शाळांत आता मराठीचे धडे !

By Admin | Updated: May 3, 2015 00:14 IST2015-05-03T00:14:56+5:302015-05-03T00:14:56+5:30

अल्पसंख्यकांसाठीच्या अमराठी शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी शिकविण्यासाठी आता मानसेवी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

Marathi Lessons in Minority Schools Now! | अल्पसंख्यक शाळांत आता मराठीचे धडे !

अल्पसंख्यक शाळांत आता मराठीचे धडे !

निर्णय : पुढील शैक्षणिक सत्रापासून होणार अंमलबजावणी
अमरावती : अल्पसंख्यकांसाठीच्या अमराठी शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी शिकविण्यासाठी आता मानसेवी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. स्पर्धा परीक्षा, राज्यसेवा परीक्षेतील इतर सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अल्पसंख्याक विद्यार्थी मागे पडत असल्याने सरकारने अस्तित्वात असलेली मराठी भाषा फाउंडेशन वर्ग ही संकल्पना सुधारित स्वरुपात स्वीकारली आहे. २०१५-१६ या वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
अल्पसंख्यक विकास विभागाने ही नवीन पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार आता राज्यभरातील अशा अमराठी शाळांमध्ये (इंग्रजी माध्यम वगळून) नवीन पद्धतीने मराठी शाखा शिकविली जाणार आहे. अल्पसंख्यक समूहाच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या १५ कलमी नवीन कार्यक्रमातही यावर भर दिला आहे. राजकीय सेवेत अल्पसंख्याक उमेदवारांचे प्रमाण वाढविण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. मराठी भाषेवर पुरेसे प्रभुत्व नसल्याने राज्य सेवा तसेच स्पर्धा परीक्षांत हे विद्यार्थी तुलनेत मागे पडत आहेत. त्यामुळे सरकारने अल्पसंख्याक शाळांतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २००६ पासून प्रयत्न सुरु केले आहे. कालौघात यातील काही पद्धती निरुपयोगी ठरल्यामुळे नवीन संकल्पनेनुसार आता मानवसेवी तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती केली जाईल. शिक्षकांना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यांची नियुक्ती ९ महिन्यांसाठी असणार आहे. त्यानंतर त्यांची सेवा संपुष्टात येऊन नवीन वर्षी नव्याने निवड प्रक्रिया राबविली जाईल. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (निरंतर) यांच्यावरही जबाबदारी सोपविली आहे.
मे महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व उर्दू तसेच मराठी माध्यमेतर शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थी संख्या, तुकड्यांची संख्या सद्यस्थितीत असलेली शिक्षकांची संख्या लक्षात घेऊन शिक्षकांची नियुक्ती केली जाईल. नियुक्तीसाठी अंतिम मान्यता जिल्हाधिकाऱ्यांची घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

अशी असेल
शिक्षकांची संख्या
१८० ते २०० विद्यार्थ्यांसाठी एक तर ३०० पर्यंतच्या संस्थांसाठी दोन शिक्षक असतील. त्यानंतर प्रत्येक १५० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक नियुक्त करता येईल. बी.एड., एम.एड. अर्हता प्राप्त केलेल्या शिक्षकांची निवड केली जाईल. १ जुलै ते ३१ मार्च या कालावधीसाठी शिक्षकांची नियुक्ती असेल. अशोभनीय वर्तन अथवा सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने शिक्षणाधिकारी नियुक्ती रद्द करु शकतील. या शिक्षकांनी शाळेत शिकवून झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना पुन्हा अतिरिक्त शिक्षकवणी करणे अपेक्षित आहे.

तीन वर्षे
मराठीचे शिक्षण
आठवी, नववी व दहावीसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विहित केलेली व अभ्यासक्रमाची मराठी क्रमिक पुस्तके असतील. या तीन वर्षांत व्याकरण, वाक्यप्रचार, म्हणी, शब्दांच्या जाती, काळ, पत्रलेखन, वृत्तलेखन असे तंत्रशुध्द मराठी शिकविले जाईल. तिमाही चाचणीतून विद्यार्थ्यांची पातळी जाणून घेतली जाईल. निकालाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर होणार आहे. या वर्गासाठीचे हजेरीपत्रक वेगळे राहील. अचानक वर्गांना भेटी देऊन कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांची असणार आहे.

Web Title: Marathi Lessons in Minority Schools Now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.