वैमनस्यातून थरार : पाठलाग, दुचाकी अडवून चाकूने केले सपासप वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 13:37 IST2021-12-26T13:25:46+5:302021-12-26T13:37:19+5:30
जुन्या वादाचा काढण्यासाठी सुदर्शनने २५ डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास अजयच्या दुचाकीचा पाठलाग करून त्याच्या पंजावर, छातीवर चाकूने वार केले व रक्तबंबाळ स्थितीत टाकून आरोपींनी तेथून पळ काढला. यात अजय गंभीर जखमी झाला.

वैमनस्यातून थरार : पाठलाग, दुचाकी अडवून चाकूने केले सपासप वार
अमरावती : जीव वाचवून पळालेल्या तरुणाची दुचाकी अडवून त्याला चाकूने भोसकण्यात आले. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ५.१५ च्या सुमारास अंबिकानगर शाळा क्रमांक १६ च्या परिसरात हा खुनी थरार घडला. अजय संतोष अंभोरे (२५, रा. उत्तमनगर गल्ली नं ३, अमरावती) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
तक्रारीनुसार, वर्षभरापूर्वी आरोपी सुदर्शन ऊर्फ बाब्या अवधुतराव शेंडे (२२, पंचशीलनगर) हा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत अजयच्या घराकडे आला होता. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी अजयने सुदर्शनला मारहाण केली होती. त्याचा वचपा म्हणून सुदर्शनने १२ डिसेंबर रोजी अजयला मारहाण केली. त्याबाबत गुन्हादेखील नोंदविला.
दरम्यान, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास अजय अंभोरे हा उत्तमनगर येथून एका वाईन शॉपजवळ आला. तेथे सुदर्शनने त्याच्याशी वाद घालून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अजय हा दुचाकीने अंबिकानगर रोडने गेला. त्यावेळी पाठलाग करून सुदर्शन शेंडे व रोहित भोंगडे (रा. बेनोडा, अमरावती) यांनी त्याची दुचाकी अडविली. रोहित भोंगडेने अजयला पकडून ठेवले, तर सुदर्शनने अजयच्या पंजावर, छातीवर चाकूने वार केले. रक्तबंबाळ स्थितीत टाकून आरोपींनी तेथून पळ काढला.
डीसीपींनी दिली भेट
जुन्या वैमनस्यातून तरुणावर चाकूने वार केल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त एम. एम. मकानदार, सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रेय ढोले, फ्रेजरपुराचे ठाणेदार राहुलकुमार आठवले यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी अजय अंभोरेला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्या बयाणानुसार सुदर्शन शेंडे व रोहित भोंगडेविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.