पत्नीच्या माहेरी रॉकेल अंगावर घेऊन जावयाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 07:02 PM2019-10-07T19:02:37+5:302019-10-07T19:12:30+5:30

पत्नी नांदायला येत नसल्यामुळे पतीने तिच्या माहेरी जाऊन अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला पेटवून आत्महत्या केली आहे.

Man commits suicide,blames wife in amravati | पत्नीच्या माहेरी रॉकेल अंगावर घेऊन जावयाची आत्महत्या 

पत्नीच्या माहेरी रॉकेल अंगावर घेऊन जावयाची आत्महत्या 

googlenewsNext
ठळक मुद्देपत्नी नांदायला येत नसल्यामुळे पतीने तिच्या माहेरी जाऊन अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला पेटवून आत्महत्या केली आहे. येवदा येथील बौद्धपुऱ्यात ही खळबळजनक घटना घडली.सचिन मारोती सवईबहादुरे असे मृताचे नाव आहे.

येवदा (अमरावती) - पत्नी नांदायला येत नसल्यामुळे पतीने तिच्या माहेरी जाऊन अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला पेटवून आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना येवदा येथील बौद्धपुऱ्यात रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. सचिन मारोती सवईबहादुरे (३५,रा. रुईखेड, ता. अकोट, जि. अकोला) असे मृताचे नाव आहे. त्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सचिन सवईबहादुरेला रविवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत ते ९० टक्के जळाल्याचे आढळले. त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आला. दरम्यान मध्यरात्रीनंतर सचिनचा मृत्यू झाला. इर्विन पोलीस चौकीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश कावरे यांनी सचिनचे बयाण नोंदविण्यासाठी गेले असता, तो बयाण देण्यास असमर्थ होता. त्यामुळे कावरे यांनी सचिनच्या नातेवाईकांचे बयाण नोंदविले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, सचिनचे दोन महिन्यांपूर्वी नम्रताशी लग्न झाले होते. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादानंतर नम्रता माहेरी येवदा येथे राहायला गेली. पती सचिन नम्रताला घरी येण्याची विनंती करीत होता. मात्र, नम्रता येण्यास तयार नव्हती. त्यामुळे रविवारी रात्री सचिन, त्याची आई व जावई असे तिघेही नम्रताच्या येवदा येथील घरी गेले. मात्र, तिचा नकार कायम होता. सचिनने वारंवार विनवणी केल्यानंतरही ती येण्यास तयार नसल्याचे पाहून अखेर सचिनने जवळ असलेले रॉकेल अंगावर ओतले आणि माचीसच्या काडीने स्वत:ला पेटवून घेतले. 

सचिनने पेट घेतल्यामुळे आरडाओरड सुरू झाली. आग विझवून त्याला वाचविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, सचिन ९० टक्के भाजल्याने त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले गेले. या घटनेची तक्रार सचिनच्या आईने सोमवारी येवदा पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी साळा वीरू प्रकाश मोहोड, सासरे प्रकाश मोहोड, सासू मंगला मोहोड, पत्नी नम्रता सवईबहादुरे व पिंकी मोहोड यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०६, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला. पत्नी व तिच्या माहेरचे लग्न झाल्यापासून माझ्या मुलाला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप मृताच्या आईने तक्रारीत केला आहे. या प्रकरणात पुढील तपास पोलीस निरीक्षक सपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रणिल पाटील करीत आहेत.

 

Web Title: Man commits suicide,blames wife in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.