हृदयद्रावक! पत्नीला स्वयंपाक कर म्हणाला अन् तो फासावर झुलला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 14:28 IST2022-01-25T14:00:04+5:302022-01-25T14:28:06+5:30
अरविंद हा दारू पिऊन घरी आला, त्याने पत्नीला स्वयंपाक बनवायला सांगितले. पत्नी शेतातील घराच्या बाहेर स्वयंपाक बनवत असताना अरविंद हा घरात होता. त्याने आतून कडी लावली व पंख्याला शेला बांधून गळफास घेतला.

हृदयद्रावक! पत्नीला स्वयंपाक कर म्हणाला अन् तो फासावर झुलला..
अमरावती : पत्नीला स्वयंपाक बनवायचे सांगून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. २३ जानेवारी रोजी रात्री मासोद येथील एका शेतातील झोपडीत ही घटना घडली. अरविंद सुखराम बेठेकर (२६, रा. कोरडा, ता. चिखलदरा, ह.मु. मासोद) असे मृताचे नाव आहे.
बेठेकर दाम्पत्य गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मासोद शिवारातील आतिश अशोक बसेरिया यांच्या शेतात रखवालदार म्हणून होते. तेथील झोपडीत ते राहत होते. २३ जानेवारी रोजी सायंकाळी अरविंद हा दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नीला स्वयंपाक बनवायला सांगितले. पत्नी शेतातील घराच्या बाहेर स्वयंपाक बनवत असताना अरविंद हा घरात होता. त्याने आतून कडी लावली व पंख्याला शेला बांधून गळफास घेतला.
‘स्वयंपाक झाला. जेवायला या,’ असे म्हणत, त्याला बोलावण्यासाठी ती घरात गेली असता आतून कडी लावल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे काहींना बोलावून तिने घरात प्रवेश केला. अन् समोरचे दृश्य पाहून तिने हंबरडा फोडला. जेवण बनविण्यास सांगून पतीने गळफास घेतल्याने ती शून्यात हरवली. त्यातून सावरत त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
रात्री १० च्या सुमारास फ्रेजरपुरा ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नरवाडे यांनी मासोद शिवार गाठून पंचनामा केला. तथा आतिश बसेरिया यांच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.