Mahendri's restroom became 108 years old | महेंद्रीचे विश्रामगृह झाले १०८ वर्षांचे
महेंद्रीचे विश्रामगृह झाले १०८ वर्षांचे

ठळक मुद्देबेदखल : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाताहत, ऐतिहासिक वास्तू जपण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : येथून २० किमी अंतरावर असलेल्या महेंद्री येथील ब्रिटिशकालीन विश्रामगृहाला १०८ वर्षे पूर्ण झाली आहेत. इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू डौलात उभी असली तरी पुरेशा डागडुजीअभावी तिला घरघर लागली आहे. वनविभागाने या विश्रामगृहाकडे दुर्लक्ष चालविले आहे. ब्रिटिशांनी सन १९१२ मध्ये या विश्रामगृहाची उभारणी विदेशी पाहुण्यांच्या निवासाकरिता केली होती.
महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर सातपुड्याच्या उंच टेकडीवर तालुक्यातील महेंद्री येथील विश्रामगृह आहे. त्या काळात या बांधकामाला २ हजार ६५८ रुपये खर्च झाल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. वातवरणीय बदलानुसार विश्रामगृहाचे वातावरण राहावे, याकरिता दगडांमध्ये भिंती बांधण्यात आल्या असल्या तरी वरचे छत गवताचे होते. वास्तव्यास असलेल्या अधिकाऱ्यांना तसेच पाहुण्यांना हवा मिळावी म्हणून दोराने हलणारा पंखा आणि ते हलविणारा माणूस असायचा. प्रकाशाकरिता कंदील होते. महेंद्री टेकडीवर अमरावती-पांढुर्णा राज्य महामार्गाच्या बाजूलाच हे विश्रामगृह साकारण्यात आले आहे.
टेकडीवर असल्याने येथून सभोवतालच्या हालचाली माहिती पडायच्या. शत्रूसुद्धा पोहोचू शकत नव्हता. येथे दोन शयनकक्ष, एक माजघर, एक भोजनकक्ष तसेच खानसामा आणि चौकीदाराचेसुद्धा निवासस्थान आहे. संपूर्ण बांधकाम दगडी आहे. सभोवताल दाट जंगल आणि बाजूच्या टेकडीवर महेंद्री हे छोटेसे २० घरांचे गाव आहे.
विश्रामगृहाची देखभाल वरूड वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून केली जाते. वनविभागाने लक्ष देऊन विश्रामगृहाची ऐतिहासिक वास्तू जपण्याची मागणी निसर्गप्रेमी संस्थांकडून केली जात आहे.

इको-टुरिझमचा प्रस्ताव धूळखात
सात-आठ वर्षांआधी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी इको-टुरिझमचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविला. मात्र, अद्यापही या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. त्या प्रस्तावास शासनाने हिरवी झेंडी दिल्यास पर्यटकांची संख्या वाढून उत्पन्नात भर पडेल. मात्र, त्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. येथील खानसामा सेवानिवृत्त झाल्यानंतर वास्तव्यास कोणीच नसतो. या विश्रामगृहाची फरपट थांबलेली नाही. येथे गेल्या दोन-तीन वर्षांपासून नूतनीकरणाचे काम सुरू असून, विद्युत व्यवस्था नाही. यामुळे विश्रामगृहाला अखेरची घरघर लागली आहे.

सुविधांमुळे सौंदर्यात भर
काळानुरूप बदल करून येथे सन १९८७-८८ मध्ये विद्युत व्यवस्था, स्वयंचलित पंखे, कौलाचे छप्पर व सुंदर उद्यान साकारण्यात आले. येथे स्वातंत्र्यानंतर उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय नेतेसुद्धा वास्तव्यास असतात. महेंद्री पंढरी जंगलातून राज्य महामार्ग, जंगलातील पशू-पक्षी तसेच सांैदर्यांत भर टाकणारा वर्धा डायव्हर्शन सुपर एकसप्रेस कॅनाल आणि तीन किमी लांबीचा विलोभनीय बोगद्याचा कालवा आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, हरिण, सांबर, निलगाय आदी प्राण्यांचा सततचा वावर पर्यटकांना मोहवून टाकणारा आहे.

Web Title: Mahendri's restroom became 108 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.