कंत्राटदाराच्या निष्क्रियतेमुळे रखडला निम्नसाखळी प्रकल्प
By Admin | Updated: October 26, 2015 00:40 IST2015-10-26T00:40:05+5:302015-10-26T00:40:05+5:30
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे सालोड येथील निम्नसाखळी सिंचन प्रकल्पाचे काम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अतिशय संथगतीने सुरू आहे.

कंत्राटदाराच्या निष्क्रियतेमुळे रखडला निम्नसाखळी प्रकल्प
काम संथगतीने : मूळ किंमत वाढल्याने कंत्राटदाराचा फायदा
मनीष कहाते वाढोणा रामनाथ
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे सालोड येथील निम्नसाखळी सिंचन प्रकल्पाचे काम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मूळ किमतीत वाढ होऊन त्याचा अप्रत्यक्ष फायदा संबंधित ठेकेदाराला होणार आहे.
सुमारे ३०० हेक्टर जमीन प्रकल्पाकरिता लागणार आहे. त्यापैकी सर्वप्रथम हरणी आणि आमडापूर येथील १५ हेक्टर जमीन तत्काळ प्रकल्पाकरिता लागणार आहे. जमीन उपलब्ध आहे. निधीची कमतरता नाही. केवळ काळी माती उपलब्ध नाही.
ती आणण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. माती नसल्याने काम रखडले आहे. त्यातच रोज बांधकामाच्या विविध साहित्याच्या किंमती वाढतीवर आहे त्यामुळे जेवढे जास्त कालावधी बांधकामाला प्रत्यक्षात लागणार तेवढा जास्त फायदा कंत्राटदाराचा होणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या किमती ठरल्या आहेत. जलसंपदा विभागाकडून पूर्ण हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. मात्र कंत्राटदार आपला खिसा कसा भरता येईल, याकडे लक्ष देत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केव्हा धरण पूर्ण होणार आणि केव्हा बारमाही ओलीताची पिके असे स्वप्न शेतकरी पाहात आहे. या धरणाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.