Locusts in Morshi, Warud, Melghat | मोर्शी, वरूड, मेळघाटात ‘टोळधाड’

मोर्शी, वरूड, मेळघाटात ‘टोळधाड’

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा/मोर्शी/वरूड : मध्यप्रदेश सीमेवरून मोर्शी, वरूड व मेळघाटात टोळधाड दाखल झाली आहे. ताशी १२ ते १६ किलोमीटरच्या वेगाने ही टोळधाड पुढे सरकत आहे. मोर्शी तालुक्यातून त्यांनी आपला मोर्चा वरूड तालुक्यातील इत्तमगाव, पळसवाडा भागात वळविला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
नाकतोडा गटातील हे कीटक लाखोंच्या संख्येने येऊन शेकडो हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान करून जातात. सोमवारी सकाळी ही टोळधाड वरूड तालुक्यात आल्याने कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. टोळधाडीने मोर्शी तालुक्यात आक्रमण केल्यानंतर सोमवारी सकाळी वरूड तालुक्यात शिरकाव केला. पुढे इत्तमगाव, पळसवाडा, काचूर्णाकडे आगेकूच केली आहे. शेतकरी तसेच संत्राबागायतदार शेतकरी या आकस्मिक हल्ल्याने हादरून गेले आहेत. ही टोळधाड पालेभाज्यांसह हिरव्या वृक्षांची पाने खात असून, लाखोंच्या संख्येने येऊन पिकाचा फडशा पाडतात. ही नाकतोड्याच्या गटातील तांबूस रंगाची वाळवंटी टोळ असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.

मेळघाटात लाखोंच्या संख्येने नाकतोडे
चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, चुरणी, डोमा परिसरात रविवारी सायंकाळी ७ वाजता अचानक लाखोंच्या संख्येने नाकतोडे आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली. परिसरात पूर्व दिशेकडून अर्थात मध्य प्रदेशाच्या भागातून हे नाकतोडे दाखल झाले आहेत. कोयलरी, काटकुंभ, डोमा, बामदेही, बागदरी या परिसरातही ते मोठ्या प्रमाणात आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मोर्शी तालुक्यातही नुकसान
मोर्शी तालुक्यातील पाळा, भिवकुंडी, भाईपूर, हिवरखेड शिवारातील संत्राझाडांवरील पाने, फळांचा बहर, मका, पन्हेरी पिकावर टोळधाड आली आहे. पाळा येथील सोनू राणे, प्रशांत राणे, रूपेश राणे, अजय गूळधे, किशोर गावंडे, शेंदूरकर, प्रकाश ढोके, ओंकार साठे, भाईपूर येथील विवेक राऊत, अनिल शिंदे, वायकुळ गुरुजी यांच्या शेतातील संत्राझाडे व मक्याची पूर्ण पाने फस्त करून मोठे नुकसान त्यांनी केले आहे. तीन किलोमीटरच्या आडव्या पट्ट्याने लाखोंच्या संख्येने ही टोळधाड पुढे सरकत आहे.

कृषी विभाग सतर्क
संत्रा, भाजीपाल्याचे नुकसान

तालुक्यात टोळधाड येताच आम्ही इत्तमगाव, पळसवाडा शेतशिवारात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकºयांना उपाययोजनाही सुचविल्या.
- उज्ज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारी, वरूड

टोळधाडीने मोर्शी, वरूडनंतर अचलपूर तालुक्याकडे रोख केला आहे. टोळधाड आढळून आल्यास शेतकºयांनी कृषी विभागाला कळवावे.
- प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी, अचलपूर

Web Title: Locusts in Morshi, Warud, Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.