नियमांनी जीवन जगा, अभिमानाचा त्याग करा
By Admin | Updated: December 23, 2015 00:19 IST2015-12-23T00:19:17+5:302015-12-23T00:19:17+5:30
संतांची संगत धरा, सद्गुरूची सेवा करा, कपटाचा त्याग करा, मंत्रांचे सतत उच्चारण करा, नियमांवर आधारित जीवन जगा, जेवढे मिळते त्यातच संतुष्ट रहा, ...

नियमांनी जीवन जगा, अभिमानाचा त्याग करा
अलकाश्रीजींचे प्रतिपादन : पाचव्या दिवशी उसळली भक्तांंची गर्दी
धामणगाव रेल्वे : संतांची संगत धरा, सद्गुरूची सेवा करा, कपटाचा त्याग करा, मंत्रांचे सतत उच्चारण करा, नियमांवर आधारित जीवन जगा, जेवढे मिळते त्यातच संतुष्ट रहा, साधे आणि सरळ जीवन जगा, अभिमनाचा त्याग करा, असा बोध प्रभू रामचंद्राने शबरीला दिल्याचा उल्लेख रामायणात आहे. अलकाश्रीजींनी प्रवचनाच्या पाचव्या दिवशी या नवधा मंत्रांची माहिती श्रोत्यांना दिली.
दुष्ट आणि नीच व्यक्तिला दंडवत करणे अत्यंत त्रासदायक असते. ज्याच्या हाती शस्त्र आहे, जो तुमची रहस्ये जाणतो. अशा व्यक्तिंपासून सावध रहायला हवे. कारण, शस्त्रधारण करणारा केव्हाही तुमच्यावर वार करू शकतो, तर तुमच्या जीवनातील रहस्ये माहीत असलेली व्यक्ती केव्हाही त्या रहस्यांचा भांडाफोड करून तुम्हाला अडचणीत आणू शकते. म्हणून अशा व्यक्तिंपासून सावध रहावे, असे अलकाश्रीजी म्हणाल्यात. ज्या ईश्वराने आपल्याला जीवन दिले त्याच्याबद्दल नेहमी कृतज्ञता बाळगावी. पढत् मूर्खांपासून सावध रहावे. मूर्खांशी वाद घालू नये. ज्ञानी माणसासोबत झालेली चर्चा नेहमीच फायदेशीर असते.
रामाच्या वनवासादरम्यान भरत भेटीच्या प्रसंगाचे वर्णन करताना अलकाश्रीजी म्हणाल्या, खुद्द रामचंद्र म्हणतात की, त्यांच्यापेक्षा मोठा तपस्वी भरत होता. त्याने १४ वर्षे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केले. म्हणूनच त्या म्हणाल्या, जर गुरू लांब गेला असेल तर त्याच्या पादुकांना गुरूस्थानी मानून त्यांची सेवा करावी. पाचव्या दिवशी आयोजित देखाव्यांत भरताची भूमिका कृष्णकांत राठी, शत्रुघ्नची भूमिका अनुपम मुंधडा, श्रीरामाची भूमिका पीयूष मुंधडा व सीतेची भूमिका रोशनी मुंधडा तर लक्ष्मणाची भूमिका अर्जुन भंडारी यांनी साकारली. प्रवचनाला भक्तांची गर्दी वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)