अमरावतीत फेक लग्नाच्या नावाखाली दारू पार्टी; पोलिसांनी ८० टिनएजर्सना घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 14:11 IST2025-07-15T14:09:48+5:302025-07-15T14:11:07+5:30
Amravati : रेस्टोबारमध्ये अल्पवयीन मुलांना दारू; आयोजक व मालकावर गुन्हे दाखल

Liquor party in the name of fake wedding in Amravati; Police take 80 teenagers into custody
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एका रेस्टॉरंट बारमध्ये आयोजित फेक वेडिंग इव्हेंटदरम्यान मद्यपार्टीतून सुमारे ७५ ते ८० टिनएजर्सना पोलिसांनी 'झिंगलेल्या' स्थितीत ताब्यात घेतले. त्यातील ४० अल्पवयीन मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातील चार अल्पवयीन मुले मद्याच्या अमलाखाली आढळून आली. १३ जुलै रोजी रात्री १० ते उशिरा रात्रीपर्यंत ती कारवाई चालली. हॉटेल 'एरिया ९१' रेस्टो बार येथे हा प्रकार सुरू होता.
मालक, आयोजकांविरुद्ध गुन्हे
रेस्टो बास्चे मालक आनंद राजू भेले (३३) यांना ताब्यात घेण्यात आले. सॅम हेमंत बजाज (१९) व त्याच्या अन्य चार अल्पवयीन साथीदारांनी या फेक वेडिंग प्रोग्रॅमचे आयोजन केल्याचे सॅमने सांगितले.
'एरिया ९१' रेस्टो बारमध्ये काही अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश देऊन त्यांना दारू सर्व्ह केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रविवारी रात्री १० च्या सुमारास तेथे धाड घालण्यात आली. तेथे तिसऱ्या मजल्यावर बारच्या आत १५० ते १७५ मुले व मुली डान्स करताना व असभ्य वर्तन करून शांतता व सार्वजनिक व्यवस्थेचा भंग करताना दिसून आले. त्यामध्ये काही अल्पवयीन मुले व मुली हे दारूच्या अमलाखाली डान्स करताना दिसून आले.