लोकसेवा आयोगाच्या मर्यादित संधीने स्वयंस्पर्धेला मिळणार चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST2021-01-04T04:11:08+5:302021-01-04T04:11:08+5:30
जाेमाने अभ्यास करून परीक्षेत मिळवावे लागेल यश, नव्या निर्णयाचे ‘कहीं खुशी, कहीं गम’ अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता ...

लोकसेवा आयोगाच्या मर्यादित संधीने स्वयंस्पर्धेला मिळणार चालना
जाेमाने अभ्यास करून परीक्षेत मिळवावे लागेल यश, नव्या निर्णयाचे ‘कहीं खुशी, कहीं गम’
अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता वारंवार परीक्षा देण्याच्या प्रकारावर बंधने आणली आहेत. केवळ खुल्या प्रवर्गाचीच मुस्कटदाबी करण्यात आली असून, ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना झुकते माप देण्यात आल्याची प्रतिक्रिया आहे. एकूणच एमपीएससीच्या निर्णयाविषयी ‘कही खुशी, कहीं गम’ अशी भावना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे.
काही तरुण क्षमता आणि शिक्षणानुसार केंद्रीय लोकसेवा अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा
देतात. यापूर्वी परीक्षांची मर्यादा नव्हती. त्यामुळे काही तरुण वयाची चाळीशी ओलांडत परीक्षा देत होते. पुढे काय करावे, अशा प्रश्न अनेक तरुणाईला पडतो. मात्र, स्पर्धा परीक्षेत सातत्याने अपयश येत असल्याने अनेक जण नैराश्याच्या गर्तेत जात असल्याचे अनुभव आहे. परंतु, आता खुल्या संवर्गाला सहा वेळा तर, ओबीसी संवर्गातील नऊ वेळा परीक्षेची संधी मिळणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना स्वयंस्पर्धा करावी लागणार असून, डेडलाईनमुळे परीक्षेसाठी जोमाने तयारी करावी लागणार आहे. सध्या भरमसाट परीक्षार्थींमुळे नाहक स्पर्धा निर्माण होते. पूर्वपरीक्षेला गर्दी करणारे अंतिम परीक्षेलाही बसत नाहीत.
त्याचा फटका प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना बसतो. मात्र, आता स्पर्धा परीक्षांच्या मर्यादेमुळे निर्धारित वेळेत परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे.
----------------------
अशाप्रकारे होईल संधीची गणना
एखाद्याने एमपीएसीच्या पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ही स्ंब्ंधित परीक्षेची संधी समजली जाईल, एखादा उमेदवार पूर्वपरीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.
---------------------
अभ्यासाचा ताण येईल, पण यश मिळण्याची खात्री
‘‘ नव्या निर्णयाने तरुणाच्या आयुष्यातील उमेदीची वर्षे वाया जाणार नाहीत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचा ताण येईल, पण यश मिळण्याची हमखास खात्री असेल. आता वयाचे भान ठेवूनच एमपीएससी परीक्षेची तयारी करावी लागेल, सहा आणि नऊ मर्यादित संधी डोळ्यासमोर ठेवूनच वाटचाल होईल.
- अक्षय काठोडे, अमरावती
--------------
प्रामाणिक विद्यार्थ्यांना नक्कीच मिळेल लाभ
एमपीएससीच्या नव्या मर्यादेमुळे प्रामाणिक तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. यूपीएसीसीच्या धर्तीवर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे वयाची बंधने लक्षात घेऊनच आता विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा प्लॅन ‘बी’ तयार करावा लागणार आहे. तांत्रिक परीक्षांचा ताळमेळ बसविण्याबाबत सरकारने लवकरच निर्णय घ्यावा.
- अनूप इंगोले, अमरावती.
-------------------
केवळ स्पर्धा परीक्षा नव्हे, ‘रिझल्ट’ महत्त्वाचा
नव्या नियमांनी अनावश्यक स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चाप बसेल. काही तरुण आई-वडिलांची मर्जी राखण्यासाठी केवळ परीक्षा देतात. आता केवळ परीक्षा देऊन उपयोग होणार नाही, तर यश मिळविण्यासाठी कस लागेल. अशातच वयाची मर्यादा लादल्याने वयासोबत उत्तीर्ण होण्याची बंधनही आले आहे.
- मृणालिनी कावळे, नांदगाव खंडेश्वर
------------------
विद्यार्थी ताणविरहित परीक्षा देऊ शकतील
एमपीएसीच्या नव्या मर्यादेमुळे कला, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना चांगली स्ंधी मिळणार आहे. अभियांत्रिकीचे विद्यार्थी पूर्वपरीक्षा द्यायचे, पण अंतिम परीक्षा देत नव्हते. आता मर्यादित स्ंधीमुळे ते परीक्षेला बसण्याचा जरा विचारच करतील. आता ताणविरहित परीक्षा देता येईल.
- पूजा रोकडे, बङनेरा