लेव्हल, अवॉर्डसाठी भरमसाठ बिल, पालक त्रस्त
By Admin | Updated: August 6, 2014 23:36 IST2014-08-06T23:36:40+5:302014-08-06T23:36:40+5:30
हल्लीच्या स्मार्ट पिढीतील मुलांच्या स्मार्ट मोबाईलवर गेम खेळण्याच्या स्मार्ट वेडाचा आर्थिक फटका पालकांना सहन करावा लागत आहे. आई, बाबा, दादा, ताईचा स्मार्ट फोन थोड्या वेळासाठी हातात मिळत

लेव्हल, अवॉर्डसाठी भरमसाठ बिल, पालक त्रस्त
मुलांना व्यसन मोबाईल गेमचे : अभ्यास, बौद्धिक, मैदानी खेळांकडे दुर्लक्ष
अमरावती : हल्लीच्या स्मार्ट पिढीतील मुलांच्या स्मार्ट मोबाईलवर गेम खेळण्याच्या स्मार्ट वेडाचा आर्थिक फटका पालकांना सहन करावा लागत आहे. आई, बाबा, दादा, ताईचा स्मार्ट फोन थोड्या वेळासाठी हातात मिळत असला तरी त्यावर गेम खेळणे, चॅटिंग करणे, इंटरनेटचा वापर करून निरनिराळ्या शंकांचे निरसन करून घेणे हे प्रकार लहान मुलांकडून मोठ्या प्रमाणात होत आहेत.
मुले इंटरनेटवरून जे गेम डाऊनलोड करतात, ते फ्री असले आणि ते खेळतानाही कोणतेही शुल्क लागत नसले तरी त्या खेळाच्या पुढच्या पायऱ्या चढताना गेमच्या आॅपरेटर्सकडून लेव्हल, अवॉर्डची मागणी करून मुले पालकांच्या नकळत पैशांचा व्यवहार करीत आहेत. विशेषत: कँडीक्रशसारख्या गेममध्ये लेव्हल व अवॉर्डसाठी पैसे लागले तरी मुलांना त्याचे काहीच वाटेनासे झाले आहे. यामुळे पालकांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे.
घरातील आई-वडील, दादा, काका, काकू यांचे मोबाईल ते सकाळी किंवा सायंकाळी घरी आल्यावरच हाताळायला मिळत असल्याने मुले काहीशी नाराज होत आहेत. शाळेत किंवा क्लासमध्ये मोबाईल आणू दिला जात नसल्याने तो हाताळायला वेळही कमी मिळत असल्याने मुले चिडचिडी झाली आहेत. अर्थात, काही मुले शाळेच्या या नियमांना न जुमानता सर्रास मोबाईलजवळ बाळगत आहेत व इतर मुलांनाही मोबाईल गेमचे वेड लावत आहेत. यामुळे अध्ययन, अध्यापनात व्यत्यय येत आहे.
पूर्वी महाग असणाऱ्या स्मार्ट फोनच्या किमती आता कमी झाल्याने मुलेही स्मार्ट फोनची मागणी करू लागले आहेत. एकुलती एक किंवा लाडाकोडाची गोड बोलून इमोशनल ब्लॅकमेल करणारी मुले पालकांना आपले हट्ट पुरे करण्यास भाग पाडत आहेत. शाळेत वा क्लासला मोबाईल नेणार नाही, अशी कबुली देत असल्याने मुलांचे हे हट्टही पूर्ण केले जात आहेत. मात्र, पालकांच्या मोबाईलवरून डाऊनलोड करून घेतलेल्या गेमचे बिल पाहून पालक आता हैराण झाले आहेत. मात्र काही पालक मुलांच्या अट्टहासापोटी हे सर्व आपसुकच सहन करीत आहेत. याचा परिणाम अभ्यासावर होत असल्याचे चित्र आहे.