‘धोंडी धोंडी पाणी दे’ पीक पाणी होऊ दे!
By Admin | Updated: July 7, 2015 00:13 IST2015-07-07T00:13:21+5:302015-07-07T00:13:21+5:30
गतवर्षीच्या भीषण दुष्काळाची झळ सोशित असताना शेतकऱ्यांनी या हंगामाच्या पेरणीसाठी कशीबशी आर्थिक तरतूद केली.

‘धोंडी धोंडी पाणी दे’ पीक पाणी होऊ दे!
पावसाची दडी : भीषण दुष्काळाचे सावट, दोन्ही नक्षत्रांत पाऊस बेपत्ता
संजय जेवडे नांदगाव (खंडेश्वर)
गतवर्षीच्या भीषण दुष्काळाची झळ सोशित असताना शेतकऱ्यांनी या हंगामाच्या पेरणीसाठी कशीबशी आर्थिक तरतूद केली. घरात असले नसले ते बियाणे खते मातीत पेरले. आणि मागील १२ दिवसांपासून पावसाची दडी व उन्हाळ्याची प्रचिती यावी अशी कडक उन्ह तापत असल्याने पेरणी केलेल्या बियाण्यांच्या अंकुराची दयनीय गत झाली असल्याने ‘धोंडी धोंडी पाणी दे’ अशी वरुणराजाची करुणा भाकत शेतकऱ्यांचे डोळे पाणावत आहे.
एक वर्षीचा दुष्काळामध्ये शेतकऱ्याला पुढील पाच वषे आर्थिक संकटाच्या खाईत लोटते. घरातील आजारपण कुटुंबातील मुला-मुलींचे शिक्षण व लग्नसमारंभ व बँकेच्या कर्जाचा सातबारा वरील बोझा हे सारे प्रश्न त्याच्या मनाला सुन्न करुन टाकतात.
जून महिन्यात पावसाने जोमात हजेरी लावली. १७ ते २२ जूनपर्यंत सतत झालेला पाऊस पाहता शेतातील पेरण्या खोळंबल्या होत्या. २३ जूननंतर मात्र पावसाने कायमचीच दडी मारली. या कालावधीत सुमारे ८० टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली.
काही शेतकऱ्यांची सुरुवातीच्या धडाक्याच्या पावसाने केलेली पेरणी निघाली नाही. ती दडपली होती, त्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली आणि आता तर पावसाच्या खंडामुळे दुपारदरम्यान तापणाऱ्या कडक उन्हात जमिनीतून निघालेल्या कोवळ्या अंकुराची केविलवाणी स्थिती झाली आहे. त्या शेतकऱ्याकडे ओलिताची सोय आहे. त्यांनी तुषार संचाद्वारे पाणी देणे सुरु केले. पण ओलिताची सोय असलेले असे अत्यल्प कास्तकार आहेत.
कोरडवाहू शेती व निसर्गाच्या लहरीपणावर शेतकऱ्यांचा प्रपंच धोक्यात आला. शेतकरी दुष्काळाच्या दुष्ट चक्रार सापडला आहे. ओलीताची सोय असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या मानगुटीवर भारनियमनाचे भूत बसले असल्याने शेतकरी जेरीस आले आहेत. कोरडवाहू शेती, त्यात १२ दिवसांपासून पावसाची दडी, कडक उन्हाने जमिनीतून निघणारे केविलवाणे पिकाचे अंकुर हेसुध्दा हेसुध्दा ग्रामीण भागातील शेतीचे विदारक व मन हेलावून सोडणारे चित्र आहे. सध्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागले आहे. पावसाची प्रतीक्षा सुरूच आहे.
सुरुवातीला झालेल्या दमदार पावसाने संत्रा, लिंबू या फळ पिकाने झाडावर नवती काढली. पण कडक उन्हामुळे आणि वातावरणातील बदल व त्यांच्या झालेल्या विपरीत परिणामामुळे संत्राबागेत मृग बहर फुटलाच नाही.
- रमेश शिरभाते,
संत्रा उत्पादक शेतकरी.
तीन एकर शेतात सोयाबीन व तूर बियाणे पेरले. त्यासाठी १२ हजार ५०० रुपये खर्च आला. पण बियाणे निघालेच नाही. नंतर दुबार पेरणी केली. मात्र त्यावर आता पाऊसच नाही. त्यामुळे दुबार पेरणीची सोय करावी लागणार आहे
- घनश्याम सारडा,
शेतकरी
नऊ बॅग सोयाबीन रासायनिक खतासह नऊ एकरांत पेरलं. त्यासाठी सुमारे ३० हजार रुपये खर्च आला. पण पेरलेले बियाणे निघालेच नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार. त्यासाठी पुन्हा जमीन तयार करणे व बियाणे व खर्च वेगळाच, अशी आमची गत दरवर्षी होत आहे.
-म.इद्रिस अ. खलील, शेतकरी.