नगरपालिका सदस्यांची प्रशिक्षण वर्गाला पाठ
By Admin | Updated: March 2, 2015 00:33 IST2015-03-02T00:33:11+5:302015-03-02T00:33:11+5:30
नगरविकास मंत्रालय व नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे विभागीय नागरी आणि पर्यावरण संशोधन केंद्र व अखिल भारतीय ...

नगरपालिका सदस्यांची प्रशिक्षण वर्गाला पाठ
अंजनगाव सुर्जी : नगरविकास मंत्रालय व नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे विभागीय नागरी आणि पर्यावरण संशोधन केंद्र व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांनी दोन दिवस नगरसेवकांकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित केले होते. यात प्रवासभत्ता वगळता भोजन व निवासी व्यवस्था केली होती. जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या १८० नगरसेवकांपैकी फक्त ५० नगरसेवक उपस्थित होते.
अंजनगावचे नगराध्यक्ष हनिफाबी व भाजपाच्या नगरसेविका सुनीता मुरकुटे हे प्रशिक्षणात उपस्थित होते. प्रशासकीय कामकाज व राजकीय समज-गैरसमज दूर करणाऱ्या या प्रशिक्षणाकडे नगरसेवकांनी केले.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरप्रशासनाचे उपायुक्त, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अभ्यासक व जिल्हा न.प.चे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालिका अधिनियमांतर्गत कलमे, नगरसेवकांची भूमिका व जबाबदारी, राज्य सरकारची धोरणे, नगरपालिकांचे अंदाजपत्रक, वित्तीय व्यवस्थापन, उत्पन्नाचे स्त्रोत आदींबाबत महत्त्वपूर्ण प्रशिक्षण दिले. सोबतच सभागृहातील कामकाजाचे नियम, शहर स्वच्छता आराखडा, उत्तम प्रशासन व नागरिकांची सनद, महिलांच्या हक्कासाठी जेंडर बजेट ही नवीन संकल्पना, चर्चासत्र व शंका निरसन या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. नगरसेवकांनी या प्रशिक्षणास दाखविलेली उदासीनता जिल्हा प्रशासनाच्या संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांच्या राजकीय आखाड्याचा अनुभव जिल्हा प्रशासनास वारंवार आलेला आहे. नगरपालिकेत जनतेने ज्या कामासाठी निवडून दिले ते सोडून पदासाठी मारामाऱ्या करणाऱ्या नगरसेवकांना हे प्रशिक्षण अनिवार्य करण्याची गरज आहे. जे नगरसेवक या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित होत त्यांची कारणे जाणून घेणे जिल्हा प्रशासनास आवश्यक असून नगरपालिकांचा कोट्यवधी रुपयांचा निधी वादविवादामुळे खर्च न होता परत जातो. (तालुका प्रतिनिधी)