आशा सेविकांना दिले जाणारे रॅपिड अँटिजेन चाचणीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST2021-05-30T04:11:34+5:302021-05-30T04:11:34+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुढील कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. याचा संसर्ग विशेषतः लहान ...

आशा सेविकांना दिले जाणारे रॅपिड अँटिजेन चाचणीचे धडे
अमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुढील कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. याचा संसर्ग विशेषतः लहान मुलांमध्ये होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आशा सेविकांना रॅपिड अँटिजेन चाचणीचे प्रशिक्षण व कोरोना वैयक्तिक सुरक्षितता किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू केली आहे.
ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. जिल्ह्यात २ हजार ८९ आशा सेविका कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत गतवर्षी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेमध्ये व्यापक जनजागृती करून प्राथमिक तपासणीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा ग्रामीण भागात होणारा प्रसार थोपविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी व लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आशा सेविकांना रॅपिड अँटिजेन चाचणी प्रशिक्षण व कोरोना वैयक्तिक सुरक्षित किट उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. अशा गावांत ग्रामसेवक, सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता गावपातळीवर गठित केलेल्या ग्राम दक्षता समितीच्या मदतीने विशेष चाचणी व लसीकरण शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व गावे कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न कसोशीने करावा, असे आवाहनही सीईओ अविश्यांत पंडा यांनी केले आहे. ताप, खोकला, सर्दीसारख्या आजाराची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांचा शोध घ्यावा. त्यांची तात्काळ चाचणी करावी. ज्या नागरिकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्यांची पूर्ण माहिती आशा सेविकांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला तात्काळ कळवावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत.
कोट
ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग थोपविण्यासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून येत्या काही दिवसांत आशा सेविकांनाही रॅपिड अँटिजेन चाचणीचे प्रशिक्षण देण्याबाबत सीईओंच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले जात आहे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी