शहरात ‘लेप्टोस्पायरोसिस’च्या उद्रेकाचा धोका !

By Admin | Updated: June 2, 2016 01:33 IST2016-06-02T01:33:31+5:302016-06-02T01:33:31+5:30

दूषित पाण्यापासून पसरणारा व ‘लेप्टोस्पायरा’ या जीवाणूमुळे होणारा गंभीर आजार ‘लेप्टोस्पायरोसिस’ शहरात हळूहळू पाय पसरू लागला आहे.

Lepotospirosis' risk of city outbreak! | शहरात ‘लेप्टोस्पायरोसिस’च्या उद्रेकाचा धोका !

शहरात ‘लेप्टोस्पायरोसिस’च्या उद्रेकाचा धोका !

अमरावती : दूषित पाण्यापासून पसरणारा व ‘लेप्टोस्पायरा’ या जीवाणूमुळे होणारा गंभीर आजार ‘लेप्टोस्पायरोसिस’ शहरात हळूहळू पाय पसरू लागला आहे. शहरात या रोगाचे काही रूग्ण आढळले असून भविष्यात या रोगाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या आरोेग्य विभागाच्यावतीने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
लेप्टोस्पायरोसिस या आजाराच्या जंतुचे बरेच ‘सिरो’ प्रकार आहेत. या रोगाची लागण झालेला पाळीव प्राणी, घरगुती प्राणी किंवा जंगली पशूंपासून देखील हा रोग उदभवू सकतो. भारतात लेप्टोस्पायरोसिस हा आजार उंदीर, गाय, म्हैस, मेंढी, बकरी, वराह, कुत्रा, गाढव, उंट, घोडा, हत्ती आदी प्राण्यांमध्ये आहेत. देशभरात या आजाराचा अनेक ठिकाणी उद्रेक होत असून शहरातही या आजाराचे रूग्ण आढळले आहेत.
माणसाच्या रक्त व लघवीमध्ये लेप्टोस्पायरा हे जंतू सापडतात. आजाराची लागण झाल्यानंतर पहिल्या सात दिवसांनी रक्तात तर १० दिवसांनी लघवीत या आजाराचे जंतू सापडतात. प्राण्यांपासून प्राण्यांना व प्राण्यांपासून माणसाला होणारा हा आजार आहे.

यकृत आणि मूत्रपिंडाला अधिक धोका
अमरावती : आजाराची लागण झालेल्या काही रूग्णांमध्ये सौम्य तर काही रूग्णांमध्ये तीव्र लक्षणे आढळून येतात. लेप्टोस्पायरोसिसमध्ये यकृत आणि मूत्रपिंडाला अधिक धोका पोहोचतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आजारामुळे विविध प्रकारच्या लक्षणांचा समूह दिसून येतो. कावीळ, विषाणूजन्य ताप, डेंग्यूसारखा रक्तस्त्रावी ताप आदी आजारांप्रमाणेच या आजाराची लक्षणे असतात. त्यामुळे रोगनिदान करताना अडचणी निर्माण होतात. रोगाचे निदान प्रयोगशाळेत रक्त व लघवी तपासून करता येते.

लागण होण्याची कारणे
या रोगाची लागण प्राण्यांच्या मलमूत्र, रक्त आणि रक्त घटकांपासून सरळ संबंधाने किंवा वातावरणातून रोगाचे जंतू माणसाच्या शरीरावरील जखमांद्वारे किंवा त्वचेवरील पातळ स्नायुुंद्वारे प्रवेश करतात. पायाला जखमा, चिखल्या, खरचटणे, इसब असेल तर या जखमेतून जंतू रक्तात प्रवेश करतात. मात्र, रोगी माणसाकडून हा आजार निरोेगी माणसांना होत नाही.

असा पसरतो आजार
रोगबाधित प्राणी मुख्यत: उंदीर, डुक्कर, गाई-म्हशी, कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. हे जंतू एक महिना ते एक वर्ष या कालावधीत प्राण्यांच्या लघवीवाटे बाहेर पडत असतात. काही प्राण्यांमध्ये आयुष्यभर जंतू त्यांच्या शरीरात राहतात. या प्राण्यांच्या लघवीने दूषित पाणी, माती, भाज्या यांचा माणसांच्या त्वचेशी संपर्क आल्यास हा रोग होतो. भात व ऊस लागवडीच्या प्रदेशात मुख्यत: या रोगाचे प्रमाण अधिक असते. अति पाऊस पडल्याने हा आजार संभवतोे.

रोगाची ही आहेत लक्षणे
तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू दुखी (मुख्यत: पाय व मांड्यांचे स्नायू), थंडी वाजणे, कावीळ, रक्तस्त्राव व रक्ताच्या उलट्या होणे, डोळे सुजणे, मूत्रपिंडाचे, यकृताचे काम बंद पडून मृत्यू ओढवू शकतो, बरेचदा रूग्णाची लक्षणे समजून येत नाहीत.

लेप्टोस्पायरोसिसवरील उपचार
रक्त तपासणीसाठी कीट बाजारात उपलब्ध आहेत. एका तपासणी कीटमध्ये ९६ रक्त नमुने तपासता येतात. विशेष उपचार प्रथमावस्थेत केल्यास फायदा होतो. यासाठी पेनिसिलिन हे औषध आणि स्ट्रेप्टोमायसिन व टेट्रासायक्लिन ही प्रतिजैविकेदेखील उपलब्ध आहेत.

अशी घ्यावी दक्षता
शेती व पशुसंवर्धन खात्याने जबाबदारी घेऊन आजारी जनावरांना बरे करणे. त्यांना स्वतंत्र ठेवणे, अशा प्राण्यांच्या लघवीचा मानवी संपर्क टाळून रोगप्रसार थांबविता येतो. या रोगाच्या प्रतिबंधासाठी मानवांसाठी लस उपलब्ध नाही.

Web Title: Lepotospirosis' risk of city outbreak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.