जंगलाबाहेर बिबट्याची संख्या वाढली; राज्यात २८०० ची नोंद

By गणेश वासनिक | Published: March 13, 2023 04:24 PM2023-03-13T16:24:05+5:302023-03-13T16:24:51+5:30

शिकारीच्या शोधार्थ शहरी भागाकडे धाव, वन विभागाकडे उपाययोजनांचा अभाव

Leopard numbers increased outside the forest; A record of 2800 in the state | जंगलाबाहेर बिबट्याची संख्या वाढली; राज्यात २८०० ची नोंद

जंगलाबाहेर बिबट्याची संख्या वाढली; राज्यात २८०० ची नोंद

googlenewsNext

अमरावती : जंगली श्वापदांचा अधिवासच मानवाने नष्ट केला आहे. वन्यजीवांना राहण्याकरिता, लपण्याकरिता पुरेशी जागाच उपलब्ध नसल्याने आता त्यांनी मानवी भागात हस्तक्षेप करायला सुरूवात केली आहे. या सगळ्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. जंगलाबाहेर बिबट्यांची संख्या वाढली असून, हल्ली राज्यात २८०० बिबट असल्याची नोंद आहे.

बिबट्यांचा अधिवास नेमका कोणता? हा आता संशोधनाचा विषय ठरू लागला आहे. व्याघ्र प्रकल्पात बिबट्याची संख्या वाढीस लागली असताना आता ग्रामीण भागात बिबट्यांचे हल्ले वाढले आहे. मागील काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. अलीकडे बिबट घरात, शेतात, शिवारात, शहरी भागात दिसून येत आहे. जंगलात बिबट्यांना पुरेशे खाद्य मिळत नाही, परिणामी त्यांनी शिकारीसाठी शहराकडे धाव घेतली आहे. राज्यात बिबट्याची संख्या नेमकी किती, याविषयी राज्याच्या वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांच्याशी
संपर्क साधला असता तूर्त ही आकडेवारी सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.

४२ बिबट मृत्युमुखी पडले

प्राणी, वृक्ष संवर्धनाविषयी समाजात जनजागृती करण्याचे काम डब्ल्यूपीएस ही संस्था करते. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या वर्षात राज्यात ४२ बिबट मृत्युमुखी पडल्याचे वास्तव आहे. ज्या भागात शिकारीसाठी बंदी आहे, त्या भागात अवैधरित्या १५ बिबट्याची शिकार करण्यात आली आहे. हिंस्त्र प्राण्यांचा नागरी वस्त्यांमध्ये वावर वाढला ही बाब धोकादायक मानली जात आहे. तर दुसरीकडे अनेकांनी कायदा हातात घेऊन त्याचे उल्लंघन केल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत.

व्याघ्र प्रकल्प बिबट्यांनी ओव्हर फ्लो

विदर्भातील मेळघाट, ताडोबा-अंधारी, बोर अभयारण्य, पेंच, नवेगाव -नागझिरा, तर पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री अभयारण्यात बिबट्यांची संख्या ओव्हर फ्लो झाली आहे. बिबट्यांना वाघांची धास्ती असल्याने ते शिकारीच्या शोधार्थ जंगलाबाहेर पडत आहेत. बिबट दीड वर्षाचा होताच तो शिकारीसाठी सज्ज होतो. बिबट उसाचे मळे, संत्र्यांचे बगीचे आणि मुबलक पाणी, शिकारीची सोय असलेल्या भागात त्यांचा वावर वाढला आहे. बिबट मादीची प्रजनन क्षमता अधिक असून, एकाच वेळी चार बछडे जन्मास घालत असल्यामुळे बिबट्याची संख्या वाढीस लागत आहे.

या भागात बिबट्याचा विस्तार वाढला

अमरावती जिल्ह्यातील पोहरा, वरूड, चांदूर रेल्वे, मोर्शी, भातकुली, तर यवतमाळ, पुणे, जुन्नर, मंचर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड, ठाणे, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अहमदनगर, पालघर या शहरी भागात बिबट्याचा विस्तार वाढला आहे.

Web Title: Leopard numbers increased outside the forest; A record of 2800 in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.